Saturday, 1 December 2012

एड्स बाधीत माता-पित्यांच्या निराधार मुलांना सामाजिक आधार देणे गरजेचे



               मुंबई, दि. 1 : एड्स बाधीत माता-पित्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निराधार मुलांना सामाजिक आधार देणे गरजेचे आहे. यासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांना मदतीचा हात देण्यासाठी विविध सामाजिक संस्थांनीही पुढे आले पाहिजे, असे मत मुख्य सचिव जयन्त कुमार बाँठिया यांनी आज येथे व्यक्त केले.
येथील जे. जे. रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात मुख्य सचिव बोलत होते. यावेळी  जे. जे. रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राठोड, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक डॉ. मानसिंग पवार, स्त्री रोग प्रसुती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. रेखा डावर, अधिक्षक डॉ. जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी  मुख्य सचिव म्हणाले, `एड्सबाधीत मातेकडून बाळाला होणारा संसर्ग प्रतिबंधक कार्यक्रम` जे.जे रुग्णालयात गेल्या 12 वर्षांपासून सुरू आहे. मुंबईसह राज्यात एड्सचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होत आहे, ही अभिनंदनीय कामगिरी आहे. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना आवाहन करतांना मुख्य सचिव पुढे म्हणाले, एड्सचे प्रमाण पुर्णत: कमी होण्यासाठी जाणीव-जागृतीवर अधिक भर दिला पाहिजे. त्याचबरोबर यासंबधी असलेल्या संशोधनपर औषधांचा देखील बारकाईने अभ्यास करावा आणि समुपदेशकाची भूमिकाही योग्यप्रकारे बजवावी.
एड्सग्रस्त माता-पित्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निराधार मुलांना सामाजिक आधार मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याकामी सामाजिक संस्थांनी पुढे आले पाहिजे असे आवाहन मुख्य सचिवांनी यावेळी केले.
            एड्सबाधीत मातेपासून बाळाला संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक कार्यक्रम सन 2000 पासून जे. जे. रुग्णालयात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे 1160 मातांची प्रसुती करण्यात आली असून त्यातील 95 टक्के मुले संसर्गमुक्त असल्याची माहिती डॉ. रेखा डावर यांनी यावेळी दिली. जे. जे. रुग्णालयातील या केंद्राला नॅकोतर्फे सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा देण्यात आला असून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेकडून देखील यावर्षी सर्वोत्कृष्ट कार्याचे पारितोषिक मिळाल्याचे डॉ. डावर यांनी प्रास्ताविकात सांगितले.

No comments:

Post a Comment