Wednesday, 19 December 2012

विधानसभा प्रश्नोत्तरे /विधानसभा इतर कामकाज : लक्षवेधी/विधानपरिषद प्रश्नोत्तरे

 
टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय बैठका घेणार
                                                        - डॉ. पतंगराव कदम
            नागपूर, दि. 19 : राज्यात पावसाअभावी बागायती पिकांचे झालेल्या नुकसानीसंदर्भात टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय बैठका घेण्यात येतील. नुकसानी पोटी शेतकऱ्यांना राज्य शासनातर्फे मदतीचा पहिला हप्ता येत्या दोन महिन्यात देण्यात येईल असे मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
            शुक्रवार, दि. 14 डिसेंबर, 2012 रोजी विधानसभा सदस्य सुभाष देसाई, विनोद घोसाळकर, प्रकाश सावंत आदींनी उपस्थितीत केलेला तारांकित प्रश्न क्र. 89,588 हा राखून ठेवण्यात आला होता. या प्रश्नावर आज चर्चा झाली. त्यावेळी डॉ. कदम बोलत होते.
            ते म्हणाले राज्यातील 13 जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती आहे. पावसाअभावी बागायती पिकांचे झालेल्या नुकसानीची केंद्र शासनाच्या पथकाद्वारे नुकतीच पाहणी करण्यात आली आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनातर्फे मदतीचा पहिला हप्ता दोन महिन्यात देण्यात येईल. दुबार पेरण्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा बँकांना त्याबाबत सूचना देण्यात येतील, असेही श्री. कदम यांनी यावेळी सांगितले.  चर्चेत नाना पटोले, विजयराज शिंदे या सदस्यांनी भाग घेतला.
0 0 0 0 0

गोवळकोट धक्क्यावरील जप्त वाळू गायब
झाल्याप्रकरणाची सचिवांमार्फत चौकशी
                                                - प्रकाश सोळंके
            चिपळूण तालुक्यातील गोवळकोट धक्क्यावर महसूल विभागाने जप्त केलेली वाळू गायब झाल्या प्रकरणाची महसूल विभागाच्या सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
            विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, सदस्य सर्वश्री सदानंद चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांनी गोवळकोट धक्का येथे महसूल विभागाने जप्त केलेल्या वाळू संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना राज्यमंत्री श्री. सोळंके म्हणाले गोवळकोट येथील नदीपात्रातील लिलाव धारकाने उत्खनन केलेल्या वाळू साठवणुकीसाठी बिनशेती परवानगी न घेता वाळू साठा केल्याने संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रॉयल्टीपोटी सुमारे 1 कोटी 39 लाख 50 हजार 200 रुपयांची दंडात्मक कारवाई त्यांच्या विरुद्ध करण्यात आली आहे. जप्त केलेल्या वाळू साठ्यापैकी काही वाळू साठा अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची विभागाच्या सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल.
0 0 0 0 0
टंचाईग्रस्त भागातील पाणीपुरवठा योजनांचा
वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही
                                                        - प्रकाश सोळंके
            टंचाईग्रस्त भागातील पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. मागणीप्रमाणे टँकर, चारा छावण्या सुरु करण्यात येतील, अशी माहिती महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
            विधानसभा सदस्य सर्वश्री किसन कथोरे, बबन शिंदे, भारत भालके, जयकुमार गोरे, शशिकांत शिंदे यांनी सांगली, सोलापूर व सातारा जिल्ह्यात पावसाअभावी पाण्याची झालेल्या गैरसोयीबद्दल प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना श्री. सोळंके म्हणाले ज्या टंचाईग्रस्त भागात 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी आहे तेथे टँकर, चारा छावणी, मजुरांना कामे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. टंचाईग्रस्त भागातील पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित केला जाणार नाही. टंचाईग्रस्त भागात मागणी प्रमाणे टँकर आणि चारा छावण्या सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
0 0 0 0
अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध झाल्यावर बुलढाणा जि.प.मध्ये
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून 10 टक्के जागा भरणार
                                                                - जयंत पाटील
            बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून 10 टक्के जागा भरण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची अद्ययावत तात्पूर्ती ज्येष्ठता यादी प्रसिद्ध झाली आहे त्याबाबतच्या आक्षेपांसंदर्भात छाननी सुरु असून अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून 10 टक्क्यानुसार उपलब्ध झालेली पदे भरण्यात येतील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.
            विधानसभेत सदस्य राहूल बोंद्रे यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून 10 टक्के जाग भरण्याबाबतचा प्रश्न विचारला होता. या लेखी प्रश्नाच्या लेखी उत्तरात ग्रामविकास मंत्री श्री. पाटील यांनी म्हटले आहे की, सन 2007-2008 मध्ये 10 टक्के प्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून पदे भरण्यात आली आहेत. 2009 मध्ये ज्येष्ठता उपलब्ध न झाल्याने भरती होऊ शकली नाही. जून 2010 ते 30 जून 2012 पर्यंत पद भरतीवर निर्बंध होते. सद्यस्थितीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची तात्पुरती ज्येष्ठता यादी प्रसिद्ध झाली असून त्यातील आक्षेपांसंदर्भात छाननी सुरु आहे. अंतिम ज्येष्ठता यादी तयार झाल्यानंतर 10 टक्क्यानुसार पदे भरण्यात येतील.
0 0 0 0 0
*विधानसभा इतर कामकाज : लक्षवेधी
नागपूरच्या मेयो रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी शासन प्रयत्नशील
-          डॉ. विजयकुमार गावीत
            नागपूर, दि. 19 : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सुपरस्पेशालीटी हॉस्पीटल व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यासाठी शासनामार्फत सकारात्मक प्रयत्न करण्यात येत आहे. या रुग्णालयातील कोबाल्ट युनीटमधील सोर्स (किरणोत्सर्ग) उपलब्ध करण्याकरीता एक कोटी रुपये त्वरीत उपलब्ध करून दिले जातील. यासंदर्भात सर्वपक्षीय सदस्यांची बैठक 29 डिसेंबर रोजी घेण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी आज विधानसभेत दिले.
            विधानसभा सदस्य सर्वश्री सुधाकर देशमुख, देवेंद्र फडणवीस, विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, विजय घोडमारे, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर पारवे, दिनानाथ पडोळे, विजय वडेट्टीवार यांनी नागपूर शहरातील मेयो रुग्णालयासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतांना डॉ. गावीत बोलत होते.
 ते म्हणाले, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठीची प्रवेश क्षमता 60 वरून 100 करण्याकरीता राज्य शासनातर्फे हमीपत्र भारतीय आयुर्विज्ञान परिषदेस सादर करण्यात आले आहे. रुग्णालातील रेडीओथेरपी विभागातील कोबाल्ट यंत्रात असलेला कोबाल्ट किरणोत्सर्गी (सोर्स) क्षमता 50 टक्क्यांपेक्षा कमी झालेली असली तरी त्याची कालमर्यादा संपली नाही. कर्करोग विभागाच्या श्रेणीवर्धनासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळण्यासाठी 55 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. रेडीओथेरेपी विभागात दोन तंत्रज्ञ तात्पुरते उपलब्ध करून देण्यात येतील, असेही डॉ. गावीत यांनी सांगितले.
0000
पाणी उपलब्धतेच्या आकडेवारीनंतर
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाबाबत निर्णय
                                                                        - सुनिल तटकरे
            अमरावती विभागातील वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या शक्य असून या प्रकल्पाला आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत अभ्यास सुरू आहे. त्यानंतर हा प्रकल्प सुरू करण्याबाबत साकल्याने विचार करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी आज विधानसभेत दिली.
            विधानसभा सदस्य ॲड. यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप यांनी वैनगंगा व नळगंगा नदीजोड प्रकल्पास मान्यता देण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावरील चर्चेला उत्तर देतांना श्री. तटकरे बोलत होते. ते म्हणाले की, या प्रकल्पामुळे भंडारा, नागपूर, वर्धा व अमरावती विभागातील यवतमाळ, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील क्षेत्र सिंचनाखाली आणणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. पाणी उपलब्धता निश्चित झाल्यानंतर या योजनेबाबत ठोस निर्णय घेण्यात येईल, असेही श्री. तटकरे यांनी सांगितले.
            चर्चेत विजयराज शिंदे, रावसाहेब शेखावत, राहुल बोंद्रे, विजय वडेट्टीवार यांनी भाग घेतला.
0 0 0 0 0
*विधानपरिषद प्रश्नोत्तरे
पहिल्या मेट्रो रेल्वे मार्ग बांधकामावर
अपघात होऊ नये यासाठी सूचना
-मुख्यमंत्री
            नागपूर, दि. 19 : मुंबईतील वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावर बांधण्यात येत असलेल्या पहिल्या मेट्रो रेल्वे मार्गाचे बांधकाम सुरु असलेला स्लॅब व सांगाडा कोसळून झालेल्या अपघातात व 1 व्यक्ती ठार व 16 व्यक्ती जखमी झालेल्या आहे. सदर प्रकरणाचे काम सुरु झाल्यापासून आतापर्यंत 6 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या प्रकल्पावर झालेल्या अपघाताच्या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून नियुक्त करण्यात आलेल्या मुख्य अभियंता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व प्राध्यापक भारतीय प्राद्योगिक संस्थान ( आयआयटी) मुंबईचे प्राध्यापक यांची द्वि-सदस्य समिती नेमली आहे.
            या समितीने अपघाताची पुनरावृत्ती होऊन नये यासाठ बांधकाम करण्यात आगोदर जमिनीचा पोत व वजन घेण्याची क्षमता तपासून पाहणे, सेवा वाहिन्यचे स्थलांतर योग्य ठिकाणी करणे, जमिनीतील खाच खळगे योग्यरितीने तपासून ते व्यवस्थित भरुन घेणे व जमीन बांधकामासाठी योग्य आहे की नाही ते तपासून घेणे आदी सूचना केल्या आहेत. या सूचनांचे कंत्राटदाराने काटेकोरपणे पालन करावे, असे सक्त आदेश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आले आहेत. तसेच मुंबई मेट्रोवन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर रु. 10 लाख इतका दंड आकारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे काम सुरु असताना दुर्घटनेत मुत्यू झालेल्या 6 व्यक्तींचा कुटुंबांना रु 47 लाख 95 हजरा इतकी आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिले.
            सर्वश्री आशिष शेलार, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील आदी सदस्यांनी या संदर्भात प्रश्न विचारला होता.
00000
शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी मराठी
माध्यमांच्या शाळांमध्ये प्रकल्प
                                                                                - मुख्यमंत्री

शाळांतील शैक्षणिक दर्जा वाढावा म्हणून मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये ‘शाळा गुणवत्ता वाढ प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. याकरिता शिक्षकांना विशेष प्रशिक्षण सुविधा तसेच शैक्षणिक सामग्री पुरविण्यात होते, तसेच विद्यार्थांना विविध सुविधांबरोबरच शाळोपयोगी वस्तू सुगंधी दुध दिले जाते. पाठ्यापुस्तके मोफत दिली जातात. मुंबई महापालिका शिक्षण विभागांतर्गत 396 मराठी शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु असून ही प्रवेश प्रक्रिया मोफत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
            या संदर्भात श्रीमती अलका देसाई, सुभाष चव्हाण, संजय दत्त आदी सदस्यांनी प्रश्न विचारला होता.
000000
औरंगाबाद महानगरपालिकेच्या समांतर पाणीपुरवठा
योजनेचा वाढीव भार नागरिकांवर नाही
                                                            - भास्कर जाधव
            औरंगाबाद महानगरपालिकेच्या समांतर जल वाहिनी प्रकल्पाकरिता सार्वजनिक बांधकाम खात्याने पैठण-औरंगाबाद या 30 मीटर रुंदीच्या राज्य मार्गाच्या कडेने जलवाहिनी टाकण्यास परवानगी दिली आहे, त्यामुळे भूसंपादनाची आवश्यकता नाही. तसेच औरंगाबाद महानगर पालिकेची समांतर पाणी पुरवठा योजना खागी सार्वजनिक सहभाग तत्वावर राबविण्यात येत असल्याने वाढीव खर्चाचा भार नागरिकांवर पडणार नाही, अशी माहिती नगर विकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आज विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
            या योजनेचे काम लवकरच सुरु होईल प्रत्यक्ष पाणी सुरु झालयावरच लिटरप्रमाणे पाणीपट्टी घेतली जाईल अशीही माहिती श्री. जाधव यांनी दिली, या संदर्भात सर्वश्री सतीश चव्हाण, विक्रम काळे, एम.एम.शेख या सदस्यांनी प्रश्न विचारला होता.
0000
सर्व महानगरपालीकांसाठी होर्डिंग संदर्भात
एकत्रित धोरण लवकरच
                                      -भास्कर जाधव
            राज्यातील सर्व महानगरपालिकांसाठी होर्डिंग्ज संदर्भातील एकत्रित धोरण लवकरच करण्यात येईल, अशी माहिती नगर विकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आज विधान परिषदेत विचारण्यात आलेल्या लेखी उत्तरात दिली.
            पुणे शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज लावणाऱ्यांविरुध्द सातत्याने कारवाया केल्या जातात. मार्च, 2012 ते नोव्हेंबर, 2012 अखेर पुणे शहारातील एकूण 407 अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यात आली असून यानंतरही अशा स्वरुपाची कार्यवाही चालू ठेवण्यात आली आहे, अशी माहिती श्री. जाधव यांनी दिली.
            या संदर्भात सर्वश्री अनिल भोसले, हेमंत टकले, दिपकराव साळुंखे आदी सदस्यांनी प्रश्न विचारला होता.
0000
चारा प्रकरणाची आयजीमार्फत चौकशी
-आर आर पाटील
अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील जनावरांचा चारा प्रकरणाची पोलीस महानिरीक्षकामार्फत (आयजी) चौकशी करण्यात येईल. या प्रकरणी कोणी दोषी आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही. अशी ग्वाही गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी विधानपरिषदेत दिली.
            260 अन्वये प्रस्तावावरील चर्चेदरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात जनावरांचा चारा लुना, एम. 80, मारुती कार, जेसीबी या  वाहनांमधून चारा वाहून नेल्याचे दाखवून गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत केली होती.
            या प्रकरणाची सी.आय.डी मार्फत चौकशी केली जाईल असे मदत व पुनर्वसन मंत्री डॉ.पतंगराव कदम यांनी श्री. तावडे यांच्या मागणीला उत्तर देताना सांगितले. दरम्यान गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी या प्रकरणाची आयजीमार्फत चौकशी करण्याची घोषणा केली.

No comments:

Post a Comment