Tuesday, 11 December 2012

12 वीच्या अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकात कोणताही बदल नाही


मुंबई, दि. 11 : फेब्रुवारी/मार्च 2013 मध्ये होणाऱ्या इयत्ता 12 वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र (कला व विज्ञान) या विषयांच्या अभ्यासक्रम अथवा पाठयपुस्तके यात कोणताही बदल केलेला नाही याची नोंद विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी घ्यावी, असे प्र.विभागीय सचिव सु.बा. गायकवाड, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय मंडळ यांनी कळविले आहे.
     राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-2005 च्या मार्गदर्शनानुसार इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित आणि संख्याशास्त्र (कला व विज्ञान) या विषयांचे अभ्यासक्रम उच्चीकृत (अपग्रेड) करण्यात आले आहेत. शासन मान्यतेनंतर या उच्चीकृत अभ्यासक्रमाची अंमलबजावणी इयत्ता 11 वीसाठी शैक्षणिक वर्ष 2011-2012 पासून तर इयत्ता 12 वीसाठी शैक्षणिक वर्ष 2012-13 पासून सुरु करण्यात आली आहे. वरील विषयांच्या उच्चीकृत अभ्यासक्रमांची इयत्ता 12 वीची प्रथम परीक्षा फेब्रुवारी/मार्च 2013 मध्ये होणार आहे.
     वैद्यकीय अभ्यासक्रमाची देशपातळीवर एकच सामायिक प्रवेश परीक्षा व देशपातळीवर विज्ञान विषयांचा सारखाच अभ्यासक्रम असावा या दृष्टीने कॉब्से यांचेकडून प्राप्त झालेल्या कोअर अभ्यासक्रमानुसार पुन्हा विज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमाची छाननी करुन त्यानुसार अभ्यासक्रम अद्ययावत केलेले आहेत व त्या अनुषंगाने पाठ्यपुस्तके तयार करतानाच आवश्यक ती काळजी घेतलेली आहे व विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची दक्षता मंडळाने घेतलेली आहे. शिक्षकांनी वेळापत्रकाचे नियोजन व्यवस्थित केल्यास अभ्यासक्रम पूर्ण करावयास काहीही अडचण येणार नाही. गणित आणि संख्याशास्त्र (कला व विज्ञान) या विषयांच्या अभ्यासक्रमाची देखील छाननी करण्यात येऊन आवश्यकता असल्यास त्या सुधारणा शैक्षणिक वर्ष 2013-2014 साठी करण्यात  येतील.

No comments:

Post a Comment