Tuesday, 11 December 2012

शैक्षणिक संस्थांनी कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरु करावेत -- राज्यपाल


        मुंबई, दि. 11 : शैक्षणिक संस्थांनी कौशल्याधारित तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम सुरु करावेत, असे आवाहन राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी आज येथे केले.
         भारत एज्युकेशन सोसायटीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मुंबई येथील षण्मुखानंद सभागृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गोपकुमार जी. नायर, एशियानेट कम्युनिकेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. माधवन कुन्नीयर, संस्थेचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, आजी-माजी विद्यार्थी, कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
        भारत एज्युकेशन सोसायटीला सुवर्ण महोत्सवाच्या शुभेच्छा देऊन राज्यपाल म्हणाले, भारत एज्युकेशन सोसायटीने केवळ 41 विद्यार्थ्यांसह सुरु केलेल्या या शाळेच्या आज तीन शाळा झाल्या असून त्यात प्रामुख्याने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील 7,500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत हे निश्चितच गौरवास्पद आहे,  अशा शब्दात राज्यपालांनी संस्थेचा गौरव केला.  
         माणसाच्या जडणघडणीत शिक्षणाचा मोठा वाटा असतो, असे विचार स्वामी विवेकानंद यांनी व्यक्त केले आहेत.   देश स्वामी विवेकानंद यांची 150 वी जयंती साजरी करीत आहे.  राष्ट्राच्या उभारणीत युवकांनी त्यांच्याप्रमाणेच महत्त्वाची भूमिका बजावून भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पुढे न्यावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. 
       सध्याच्या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थी प्रचंड दबावाखाली आहे, त्यामुळे शिक्षकांनी मुलांना विचार करण्यास प्रवृत्त करावे.  मुलांच्या मनात विविध गोष्टींबद्दल उत्सुकता निर्माण झाली पाहिजे.  ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी विषयात रस नाही ते विद्यार्थीही अभियांत्रिकी शाखेमध्ये केवळ पालकांच्या दबावाखाली प्रवेश घेतात.  आपल्या मुलाचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे याचा पालक व शिक्षकांनी अभ्यास करावा आणि त्याच्या आवडीचे क्षेत्र त्यांना निवडू द्यावे.  प्रत्येक विद्यार्थी त्याच्या आवडीच्या क्षेत्रातील विषयाचा तज्ज्ञ बनला तर त्यालाही त्याच्या आवडीनुसार नोकरीची संधी उपलब्ध होईल, अथवा तो उद्योजक बनेल.  आज आपल्याकडे वरिष्ठस्तरावर अनेक उत्तम अभियंते आणि व्यवस्थापनातील तज्ज्ञ व्यक्ति कार्यरत आहेत.  तथापि कनिष्ठ स्तरावर अकुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे उद्योग क्षेत्रात आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध होत नाही,  त्यामुळे कौशल्याधारित अभ्यासक्रमाची अत्यंत गरज आहे,  असे राज्यपाल यावेळी म्हणाले. 
      विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करून उत्तम नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा तसेच सामाजिक बांधिलकी जपावी, असा संदेश राज्यपालांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

No comments:

Post a Comment