नागपूर, दि. 20 : सर्वसामान्यांचे
प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी या दोघाची भूमिका
महत्वाची आहे. जनतेच्या आशा आकांक्षा लोकप्रतिनिधी मार्फत शासनाकडे पोहचतात आणि
त्यास अनुसरुन जनतेच्या हितासाठी शासन विधिमंडळात कायदे करीत असते, असे
प्रतिप्रादन अपर मुख्यसचिव डॉ. सुधीर
कुमार गोयल यांनी आज येथे केले.
वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राच्या वतीने
विधिमंडळ सदस्यासाठी ‘मंत्रालयीन कामकाज
आणि त्यांचा विधीमंडळाशी संबध’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते
त्यावेळी श्री. गोयल बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री वसंतराव खोटरे, सुभाष
चव्हाण, भगवानराव साळुंके, नागो गाणार, हरिष पिंपळे, मनीष जैन, बाबासाहेब पाटील,
संजय दत्त, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नागेश केसरी उपस्थित
होते.
प्रशासकीय अधिकारी जनतेचे
लोकसेवक असतात मात्र हे अधिकारी आपण लोकसेवक नसून जनतेवर शासन करणारे आहोत असे
समजू लागल्यास लोक प्रतिनिधी आणि त्यांच्यात संघर्ष निर्माण होतो असे सांगून श्री.
गोयल म्हणाले, जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी दोघांची आहे.
त्यामुळे त्यांच्यात संवाद असणे आवश्यक आहे. विधिमंडळ अधिवेशन यासाठी महत्वाचा
दुवा आहे. विविध संसदीय आयुधामार्फत हा संवाद साधण्यास मदत होते. मंत्रालयात 27
विभाग असून या विभागांचे 55 सचिव आहेत. यांच्यामार्फत विधीमंडळात कामकाज पोहचते.
श्री. गोयल म्हणाले की, विधिमंडळ कामकाजास शासन
सर्वोत्तम प्राधान्य देते. लोक प्रतिनिधींच्या प्रश्नांना वेळेत उत्तर मिळत नाही
हा गैरसमज आहे. मात्र काहीवेळा सुसंवादा अभावी अडचणी निर्माण होतात. एखाद्या
प्रश्नाबाबत वस्तुस्थिती लपविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ती उघड होतेच कारण
लोकप्रतिनिधींचा संपर्क दांडगा असतो त्याशिवाय माध्यमांचाही वचक प्रशासनावर असतो.
मंत्री महोदयांचाही आग्रह असतो की, त्यांच्या समोर खरी माहिती यावी.
लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला जातो आणि त्यात चुका आढळल्यास
त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाते. मात्र त्यांवर केलेली कार्यवाही विधिमंडळात
सांगताना शासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला जातो. असेही त्यांनी सांगितले.
प्रशिक्षण केंद्राचे संचालक नागेश केसरी यांनी प्रास्ताविक केले.
No comments:
Post a Comment