Sunday, 16 December 2012

शासनाच्या योजनांपासून गावांमधील एकही नागरिक वंचित राहू नये - कृषि राज्यमंत्री ना. देवकर

              जळगांव, दि. 16 :- प्रत्येक गावांमधील युवकांनी शासनाच्या सर्व योजनांची माहिती नागरिकांना देऊन सदरच्या योजनेपासून गावांमधील एकही नागरिक वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन कृषि राज्यंमत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले. ते आज सकाळी बेळी ता. जळगांव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
             यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक वाल्मीक पाटील, जळगांव पंचायत समितीचे उपसभापती विजय नारखेडे, नशिराबादचे माजी सरपंच पंकज महाजन, बेळीचे सरपंच श्री. इंगळे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या श्रीमती मंगला पाटील आदिंसह  ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
              गावांमधील प्रश्न जाणून युवकांनी ते सोडविण्यासाठी ज्येष्ठांना सहकार्य करावे. तसेच ते प्रश्न मार्गी लागावे म्हणून लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचेकडे वारंवार पाठपुरावा करावा, अशी सूचना ना. देवकर यांनी केली. तसेच युवकांनी गावांमध्ये नवीन योजना, उपक्रम आदि राबवून गावाच्या  व परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
               यावेळी बेळी गावच्या ग्रामस्थांनी ना. देवकर यांचेकडे बौध्द समाज मंदिर, स्मशानभूमीला कम्पाऊंड वॉल, एस. टी. बसच्या संख्येत वाढ, बीपीएल च्या यादीत ग्रामस्थांचा समावेश, आधार कार्डची नोंदणी   बेळी ते नशिराबाद रस्त्याची दुरुस्ती आदि मागण्या करण्यात आल्या.
               ना. देवकर यांनी  मागण्यांपैकी बेळी ते नशिराबाद रस्ता, स्मशानभुमी कम्पाऊंड वॉल, एस. टी. च्या फे-यात वाढ आदि बहुतांश मागण्या तात्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
             प्रारंभी ना. देवकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचे फीत कापून उदघाटन केले. सरपंच श्री. इंगळे यांनी प्रास्ताविक व आभार मानले.

No comments:

Post a Comment