Wednesday, 19 December 2012

देशातील सर्वच राज्यांमध्ये विधानपरिषद निर्माण होणे गरजेचे - शिवाजीराव देशमुख



नागपूर, दि. 19 : संसदीय लोकशाही पध्दतीमध्ये विधानपरिषदेचे महत्व अनन्यसाधारण असून, देशात सर्वच राज्यांमध्ये विधानसभेबरोबर विधानपरिषद निर्माण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी केले.
विधानपरिषद सभागृहात आज आयोजित 42 व्या राष्ट्रकूल संसदीय अभ्यासवर्गात  ‘वरिष्ठ सभागृहाचे संसदीय लोकशाहीतील महत्व’ या विषयावरील व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, माजी आमदार उल्हास पवार यांच्यासह राज्यातील विविध विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक, विद्यार्थी  उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले सध्या देशातील 28 राज्यांपैकी फक्त 6 राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे. यात महाराष्ट्राचा समावेश आहे. उर्वरीत 22 राज्यांमध्ये  अद्याप विधानपरिषद अस्तित्वात आलेली नाही. विधानपरिषदेची निर्मिती करावी किंवा नाही याबाबतचा अधिकार त्या त्या राज्यांच्या विधानसभांना देण्यात आला असून, ही मोकळीक आपल्या लोकशाही  पध्दतीतील खूप मोठी उणीव आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सर्व राज्यांमध्ये विधानपरिषदेची निर्मिती अनिवार्य होण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त  केली.
श्री. देशमुख म्हणाले संसदीय लोकशाही पध्दती स्वीकारलेल्या बहुतांश पाश्चात्त्य  देशांमध्ये दोन्ही सभागृहे अस्तित्वात आहेत. आपल्या देशातसुध्दा लोकसभेबरोबर राज्यसभा अस्तित्वात आहे. त्या अनुषंगाने देशातील सर्वच राज्यांमध्ये विधानपरिषदांची निर्मिती होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
द्विस्तरीय राज्यपध्दतीमुळे समाजातील विद्वान,  शास्त्रज्ञ, साहित्त्यिक, कलाकार  अशा घटकांना शासनप्रणालीत सहभागी  होण्याची  संधी मिळते. त्यामुळे देशाच्या विकासप्रक्रियेत  या लोकांचे महत्त्वपूर्ण योगदान उपलब्ध होते, असे यावेळी माजी आमदार उल्हास पवार यांनी सांगितले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाची विद्यार्थिनी निकीता भोयर हिने याप्रसंगी  आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सभापती श्री. देशमुख  यांच्या  हस्ते अभ्यासवर्गात सहभागी झालेले  प्राध्यापक व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

No comments:

Post a Comment