Monday, 17 December 2012

विधिमंडळ व प्रसारमाध्यमांचे काम एकमेकांना पुरक - सुरेश द्वादशीवार



            नागपूर, दि. 17 : विधिमंडळ आणि प्रसारमाध्यमे जनमताचा आरसा म्हणून ओळखली जातात. जनतेचे प्रश्न मांडण्याचे काम दोन्हींमार्फत केले जाते. त्यामुळे विधिमंडळ आणि प्रसारमाध्यमे या दोन्ही संस्थांचे काम एकमेकांना पुरक आहे, असे प्रतिपादन दै. लोकमत, नागपूरचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले.
            विधानपरिषद सभागृहात आयोजित 42 व्या राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गात विधिमंडळाचे कामकाज आणि प्रसारमाध्यमांची भूमिकाया विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानपरिषदेचे माजी सदस्य गिरीश गांधी उपस्थित होते.
            श्री. द्वादशीवार पुढे म्हणाले, लोकशाही व्यवस्थेत विधिमंडळ आणि प्रसारमाध्यमांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्याचे हे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. मात्र, या दोन्ही क्षेत्रात अनेक अपप्रवृत्तींचा शिरकाव होत आहे. व्यापक लोकहिताच्या तळमळीने प्रेरित असणाऱ्या नेत्यांची सभागृहात उणीव भासत आहे. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी अनेकदा या व्यासपीठाचा वापर करण्याचा प्रयत्न होतो. माध्यमांच्या क्षेत्रातील व्यावसायिकतेच्या अतिरेकामुळे त्याच्या विश्वसनियतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दोन्ही संस्थांवर आपली प्रतिष्ठा आणि विश्वसनियता टिकविण्याचे मोठे आव्हान पुढील काळात असणार आहे.
            जगात मोठ्या प्रमाणात परिवर्तन घडून येत आहे. सुधारणांचा वेग वाढला आहे. हे परिवर्तन ओळखता आले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खरा अर्थ जाणणारे, स्वतंत्र बुद्धीने, विचाराने निर्णय घेणारे नेते, पत्रकार तुमच्या मधून निर्माण व्हावेत आणि व्यापक जनहिताचे कार्य तुमच्या हातून घडावे, असे आवाहनही श्री. द्वादशीवार यांनी विद्यार्थ्यांना केले.
            प्रारंभी विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने यांनी श्री. द्वादशीवार यांचा परिचय करुन दिला. यावेळी श्री. द्वादशीवार यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माधव शिंदे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment