नागपूर, दि. 19 : संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर निर्माण झालेल्या भौगोलिक
ऐक्याच्या पुढे जाऊन महाराष्ट्राचे भावनिक ऐक्य साधण्याचे मोलाचे काम स्व.
यशवंतराव चव्हाण आणि स्व. वसंतराव नाईक यांनी केल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेचे माजी सदस्य उल्हास
पवार यांनी केले. विधानपरिषद सभागृहात आयोजित 42 व्या राष्ट्रकुल संसदीय
अभ्यासवर्गात स्व.यशवंतराव चव्हाण आणि स्व. वसंतराव नाईक यांच्या आठवणींना उजाळा
देताना ते बोलत होते.
श्री. पवार पुढे म्हणाले, यशवंतराव आणि वंसतराव हे
महाराष्ट्राचे दोन महान सुपूत्र होते. आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण करण्यात
त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर
विविध प्रदेशात विखुरलेला महाराष्ट्र एक
झाला. मात्र या भौगोलिक ऐक्याच्या पुढे
जाऊन जातीभेद विरहित, प्रांतविरहित भावनिक ऐक्य
निर्माण करण्याचे काम या दोन नेत्यांनी केले. पुरोगामी विचारसरणी असणाऱ्या महाराष्ट्राचा पाया भक्कम केला. व्यापक लोकहित साधणारे निर्णय
घेऊन महाराष्ट्राला प्रगतीच्या वाटेवर
नेले.
यशवंतराव आणि वसंतराव यांच्या विचारात अनेक साम्यस्थळे
आढळून येतात. शेती आणि शेतकऱ्यांविषयीची तळमळ, उपेक्षितांबद्दलचा कळवळा, जातीधर्म
विरहित राजकारण, व्यापक सामाजिक भान आणि अखंड
कार्यप्रवणता हे ते समान गुण दोन्ही नेत्यांमध्ये होते. स्वत: कार्य करुन
इतरांना श्रेय देणाऱ्या या नेत्यांनी कार्यकर्त्यावर उदंड प्रेम केले. तळागाळातील
सामान्य तरुणांना नेतेपदाची संधी दिली. आजच्या
प्रगतिशील महाराष्ट्राची पायाभरणी या दोन नेत्यांच्या विचार आणि कृतीतून
झाली आहे, असेही श्री. पवार म्हणाले.
प्रारंभी विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी नीलेश मदाने यांनी
श्री. पवार यांचा परिचय करुन दिला.
No comments:
Post a Comment