Saturday, 29 December 2012

विकास योजनासाठी उपलब्ध निधी कालबध्दरितीने खर्च करण्याची दक्षता घ्यावी : पालकमंत्री गुलाबराव देवकर



            जळगांव, दि.29 :- सर्व विकास योजना राबविणा-या अधिका-यांनी त्यांच्या मार्फत राबविण्यात येणा-या विविध विकास योजनांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी कालबध्द रितीने खर्च करण्याची दक्षता घ्यावी . जे अधिकारी खर्च करण्यास असमर्थ ठरतील त्यांचेवर कारवाई करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्यात येईल याची नोंद घेऊन विकास कामांसाठीचा निधी खर्च करावा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज येथील अल्पबचत भवनात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत केले.
          प्रारंभी 30 जुलै रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या नोव्हेंबर 2012 अखेर पर्यत झालेल्या सर्व साधारण, अनुसूचित जाती   उपयोजना , आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उप योजनांच्या विकास कामावरील खर्चाचा आढावा घेण्यात आला.
          तसेच सन 2012-2013 मधील योजनांचा पुर्निविनियोजन प्रस्तावांना बैठकीत मंजूरी देण्यात आली. व सन 2013-2014 च्या प्रारुप आराखडयाबाबत चर्चा करण्यांत आली.
          बैठकीत जिल्हयात उदभवलेल्या भिषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाय योजनांवर सखोल चर्चा करण्यांत आली. यात प्रामुख्याने विहिर खोलीकरण, विहिर अधिग्रहण , अपूर्ण नळ योजना पूर्ण करणे, विंधन विहिरी घेणे , नादुरुस्त नळ पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, नवीन नळ योजना राबविणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती आणि टँकर व बैलगाडया मार्फत पिण्याचे पाणी पुरविणे आणि नदीवरील बंधा-यांच्या दुरुस्तीची कामे व नवीन बंधारे बांधणे याबाबत चर्चा करण्यांत आली.
        बैठकीत विधानसभा  विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे, जि. प. अध्यक्ष दिलीप खोडपे, खा. हरिभाऊ जावळे, खा. ए. टी. नाना पाटील, आ. संजय सावकारे,आ. गिरीष महाजन, आ. शिरीष चौधरी, आ. कृषिभुषण साहेबराव पाटील, आ. चिमणराव पाटील, आ. जगदिश वळवी, आ. दिलीप वाघ  तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांनी विविध विषयावरील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी शितल उगले, अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ तसेच विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.       
                                                                     * * * * * * *

No comments:

Post a Comment