जळगांव, दि. 18 :- राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत गतिमान वैरण विकास
कार्यक्रम ही योजना रब्बी हंगामामध्ये जिल्हयातील संपूर्ण 15 तालुक्यांमध्ये सुमारे
2 हजार हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येणार आहे. तरी ज्या शेतक-यांकडे पाणी उपलब्ध
आहे त्यांनी चारा पिकांचे उत्पादनासाठी सदरच्या योजनेत मोठया प्रमाणावर सहभागी
होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के.एस.मुळे यांनी केले आहे.
यावर्षी राज्यात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती
निर्माण झालेली असून जनावरांच्या चा-याचा प्रश्न ही निर्माण झालेला आहे. जळगांव सह
नजीकच्या औरंगाबाद, जालना, अहमदनगर व बीड जिल्हयातून मोठया प्रमाणावर जनावरांना
छावण्यांतून चारा पुरवावा लागेल, अशी माहिती श्री. मुळे यांनी दिली.
त्यामुळे जिल्हयातील पाणी उपलब्ध असलेल्या शेतक-यांना चारा पिकासाठी ज्वारी
एस.एस.जी 898, मका, ऑफिकन टॉल व नेपियर गवताचे डोंब मोफत पुरविले जाणार आहे. सदरची
चारा पिके जिल्हयातील सर्व तालुक्यांमधील एकूण 2 हजार हेक्टर क्षेत्रावर घेण्यात
येणार आहेत. तसेच यासोबत इतर निविष्ठांचा देखील शेतक-यांना अनुदानावर पुरवठा केला
जाणार असल्याचे श्री. मुळे यांनी सांगितले.
तरी जळगांव जिल्हयातील जास्तीत जास्त शेतक-यांनी गतीमान वैरण विकास
कार्यक्रमात सहभाग घेऊन चारा टंचाईवर मात करण्याचे आवाहन श्री. मुळे यांनी केले
आहे.
No comments:
Post a Comment