Monday, 17 December 2012

राज्याच्या प्रगतीसाठी सदृढ अर्थव्यवस्था महत्त्वाची - अरुण गुजराथी



नागपूर, दि. 17 : राज्याच्या प्रगतीसाठी सुयोग्य राजकारणाबरोबरच सदृढ अर्थव्यवस्था असणे देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे अर्थसंकल्प सादर करताना तो सामाजिक  न्याय देणारा, गरिबी कमी  होण्यास सहाय्यभूत ठरणारा तसेच लोककल्याणकारी राज्याची संकल्पना वृध्दींगत करणारा असावा, अशी अपेक्षा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी व्यक्त  केली.
            विधानपरिषद सभागृहात आज आयोजित 42 व्या राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गात 'अर्थसंकल्पाची प्रक्रिया'  या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार रमेश शेंडगे यांच्यासह राज्यशास्त्राचे  अभ्यासक, विद्यार्थी  उपस्थित होते.
            श्री.गुजराथी म्हणाले की, उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ म्हणजे अर्थसंकल्प होय. अर्थसंकल्पात उत्पन्न  कमी व खर्च जास्त अशी परिस्थिती नेहमीच असते. त्यामुळे खर्चाचे प्राधान्यक्रम ठरविले जातात. हे प्राधान्यक्रम ठरविताना शिक्षण, सामाजिक न्याय व गरिबी निर्मुलनाला अनन्यसाधारण महत्व असावे, अशी अपेक्षा त्यांनी  व्यक्त केली.
            समाजातील 'नाही रे' वर्गातील लोकांचे सक्षमीकरण करण्यासाठी  त्यांना ब-याच वेळा अनुदानाचा आधार  द्यावा लागतो. यासाठी ब-याच वेळा  'आहे रे ' वर्गातील लोकांवर अधिकचे कर लावून महसूल वाढविला  जातो. कुठल्याही प्रकारचा असंतोष निर्माण न होता अशी करवाढ करवून घेण्यासाठी  सरकारचे व अर्थमंत्र्यांचे कौशल्य महत्वाचे असते, असे ते म्हणाले. 'आहे रे ' वर्गाकडून महसूल वसुली करुन त्याआधारे ' नाही रे ' वर्गाचे सक्षमीकरण  व्हावे, असेही  ते म्हणाले.
            श्री.गुजराथी  यांनी यावेळी  अर्थसंकल्पाची  संपूर्ण प्रक्रिया उपस्थितांना समजावून  सांगितली.

No comments:

Post a Comment