Monday, 31 December 2012

सशक्त समाजाच्या निर्मितीमध्ये वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची - हेमंत अलोने

         जळगांव, दि. 31 :- समाजाची जडणघडण योग्य पदध्दतीने करुन सशक्त समाजाच्या निर्मितीमध्ये वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन दैनिक देशदूतचे संपादक हेमंत अलोने यांनी केले. ते आज सकाळी मूलजी जेठा महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित आदय पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या व्दिजन्म शताब्दी निमित्त कार्यक्रमात पत्रकारितेच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करत होते.
         सदरचा कार्यक्रम जिल्हा माहिती कार्यालय व मुलजी जेठा महाविद्यालयाच्या संयुक्त विदयमाने आयोजित करण्यात आला. यावेळी मूलजी जेठा महाविद्यालयाचे उप प्राचार्य एन. एम. भारंबे, जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख श्रीकृष्ण जळूकर, जिल्हा माहिती अधिकारी आर. डी. वसावे, प्रा. सुरेश तायडे , प्रा. आशिष मलबारी, आदि सह पत्रकारितेचे विदयार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
        श्री. अलोने पुढे म्हणाले प्रसार माध्यमे ही एक शक्ती असून तिचा वापर विधायक कार्यासाठी करावा. तसेच समाजाचे प्रबोधन करुन उन्नत व शिक्षित समाजाच्या उभारणीचे काम पत्रकाराकडून झाल्यास ते पत्रकारितेला न्याय दिल्यासारखे असेल, असे त्यांनी सांगितले.
       बहुतांश लोक वृत्तपत्रे वाचून मत तयार करतात. त्यामुळे वृत्तपत्रांनी सकारात्मक पत्रकारिता करावी, असे श्री. अलोने यांनी म्हटले . कारण सातत्याने नकारात्मक वृत्ते दिल्यास यंत्रणा निर्ढाविली जाऊन वृत्तपत्राची दखल घेतली जाणार नाही व त्यातून पत्रकारिता हे हत्यार बोथट होण्याचा संभव असतो, असे  त्यांनी सांगितले.  वृत्तपत्र क्षेत्रात कार्य करत असताना नवीन पत्रकारांनी काय छापावे यापेक्षा काय छापू नये याचे ज्ञान घ्यावे, व याकरिता पत्रकारितेचा तंत्रशुध्द अभ्यास करण्याचे आवाहन श्री. अलोने यांनी केले. कारण चांगला पत्रकार होण्यासाठी महाविद्यालयीन अभ्यासक्रम महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
      जिल्हा माहिती अधिकारी आर. डी. वसावे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगून जिल्हा माहिती कार्यालयामार्फत करण्यात येणा-या वृत्तपत्रीय कामकाजाची माहिती दिली. तसेच शासकीय कार्यक्रमाचे वृत्तांकन करत असताना पाळण्यात येणा-या आचार संहितेबाबात  त्यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
        जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख श्रीकृष्ण जळूकर यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी आचार्य  बाळशात्री जांभेकर यांच्या व्दि-जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमाचा उद्देश सांगून जांभेकराच्या वृत्तपत्र क्षेत्रातील कार्याची माहिती विदयार्थ्याना दिली. तर प्रा. सुरेश तायडे यांनी बाळशात्री जांभेकरांना अभिप्रेत असलेली समाज प्रबोधन करणारी पत्रकारिता करण्याचे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात उप प्राचार्य श्री. भारंबे यांनी समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकाराकडून केले जात असते असे सांगून विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात कार्य करतांना प्रचंड वाचन करण्याची सूचना केली.
           प्रारंभी संपादक हेमंत अलोने यांच्याहस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरुवात झाली.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंजुषा पवणीकर यांनी केले. तर आभार माहिती  अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालय टीम  व प्रा. अशीष मलबारी, प्रा. प्रवीण चौधरी आदिनी  परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment