Tuesday, 4 December 2012

शासनाकडून टंचाईग्रस्त भागातील शेतक-यांना सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा



        जळगांव, दि. 4 :- राज्यात यावर्षी कमी पाऊस झाल्याने फळबागांवर मोठा परिणाम झाला असून अशा फळबागांना तातडीची उपाय योजना करणे आवश्यक असल्याने शासनाने दि. 29 नोव्हेंबर 2012 रोजी टंचाईग्रस्त भागातील शेतक-यांना आवश्यक कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचा कर्ज पुरवठा हा सवलतीच्या व्याज दराने केला जाईल, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी के.एस.मुळे यांनी दिली आहे.
        टंचाईग्रस्त भागातील फळबागा जीवंत राहाव्यात म्हणून शेतात शेततळे , सेंद्रिय खताचा वापर व फळझाडाला आच्छादन आदि तातडीच्या उपाय योजना शेतक-यांना कराव्या लागत आहेत. तसेच काही ठिकाणी फळबागांना टॅकरव्दारा पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतक-यांना सदरच्या उपाय योजना राबविता याव्यात म्हणून शासनाने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे श्री. मुळे यांनी सांगितले.
        सदरच्या उपाय योजना राबविण्यासाठी शेतक-यांना हेक्टरी 30 हजार रुपये खर्च गृहित धरला असून त्याच्या 90 टक्के पर्यंत कर्ज बॅकांकडून शेतक-यांना घेता येईल. सदरच्या कर्जावर 12 टक्के व्याज दर असून त्यावर केंद्र शासनाकडून 5 टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती श्री. मुळे यांनी दिली.
        तसेच कर्जदार शेतक-यांनी मुदतीच्या आत कर्जाची परतफेड केल्यास 3 टक्के सवलत देण्याचा राज्य शासन विचार करत आहे. तरी सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतक-यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी 31 डिसेंबर 2012 पर्यंत संपर्क साधून अर्ज सादर करण्याचे आवाहन श्री. मुळे यांनी केले. सदरचे कर्ज 31 डिसेंबर 2012 पर्यंत मंजुर होऊ शकतील असे ही त्यांनी सांगितले. सदरची योजना ही राज्य शासनाकडून जाहीर झालेल्या दुष्काळी जिल्हा व तालुक्यासांठी लागू असणार आहे. 

No comments:

Post a Comment