Monday, 24 December 2012

ग्राहकराजाने सतत जागे राहण्याची गरज -ग्राहकतीर्थ बिंदूमाधव जोशी



             नाशिक 24- संपूर्ण देशात 1986 सालापासून राष्ट्रीय ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला असला तरी आपल्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ग्राहक राजा सतत जागा राहिला पाहिजे असे प्रतिपादन भारतातील ग्राहक संरक्षण चळवळीचे प्रणेते , ग्राहकतीर्थ, स्वातंत्र्य सैनिक बिंदू माधव जोशी यांनी आज केले. 24 डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त श्री.रवींद्र जाधव होते.
            श्री.जोशी पुढे म्हणाले की, उद्योजक, व्यापारी, कामगार, शेतकरी आणि ग्राहक हे अर्थव्यवस्थेचे महत्वाचे पाच घटक आहेत. यातील एक घटक जरी नसला तरी अर्थव्यवस्था चालणार नाही. त्यामुळे कार्ल मार्क्सच्या सिध्दांतापेक्षा ही संकल्पना व्यापक आहे. ग्राहक संरक्षण कायदा हा समाजाच्या कोणत्याही घटकाच्या विरोधात नसून तो अनुचित व्यापार, व्यवहार करणाऱ्याच्या विरोधात आहे असे सांगून त्यांनी देशातील ग्राहक चळवळीचा, हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळच्या परिस्थितीचा आणि आजच्या परिस्थितीचा आढावा घेत सखोल विवेचन केले.
            विभागीय आयुक्त श्री.रवींद्र जाधव यांनी प्रारंभी श्री.बिंदू माधव जोशी यांचे स्वागत करुन समाजातील प्रत्येक व्यक्ती ही ग्राहकच असते म्हणून सर्वांनी आपल्या हक्कांचे व कर्तव्याचे मनापासून पालन केले पाहिजे असे सांगितले. नाशिक ग्राहक पंचायतीचे विभागीय संघटक श्री.अरुण भार्गवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर विभागीय अध्यक्ष श्री.मार्तण्डराव जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.
            या कार्यक्रमास श्री. रावसाहेब भागडे, उपायुक्त (पुरवठा) विविध वरिष्ठ अधिकारी, ग्राहक मंच महाराष्ट्र नाशिक विभागाचे उपाध्यक्ष मनोहर चव्हाण, ग्राहक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
स्मरणिकेचे प्रकाशन
            ग्राहक संरक्षण कायद्याच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त  "ग्राहक दिपʺ या स्मरणिकेचे यावेळी मान्यवरांचे  हस्ते प्रकाशनही करण्यात आले.

No comments:

Post a Comment