Wednesday, 19 December 2012

विधानमंडळ हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम - दिलीप वळसे-पाटील



नागपूर, दि. 19 : स्वातंत्र्यपूर्व काळात देशात अनेक समस्या होत्या. आज या परिस्थितीत आमुलाग्र  परिवर्तन घडून आले असून, एक सशक्त लोकशाही राष्ट्र  म्हणून जगात भारताची प्रतिमा निर्माण झाली आहे. या बदलामागे विधानमंडळाचे योगदान महत्त्वाचे असून विधानमंडळ हे सामाजिक परिवर्तनाचे  प्रभावी  माध्यम आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केले. विधानपरिषद सभागृहात आयोजित 42  व्या राष्ट्रकुल संसदीय अभ्यासवर्गात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके उपस्थित होते.
श्री. वळसे-पाटील पुढे म्हणाले, लोकमताचा दबाव आणि लोकप्रतिनिधींचा प्रभाव हा लोकशाहीचा गाभा आहे. लोकांच्या इच्छा-आकांक्षांना मूर्तरुप देणारे निर्णय इथे घेतले जातात. विधानमंडळात घेतल्या जाणाऱ्या निर्णयाचा परिणाम जनतेच्या भवितव्यावर घडून येतो. त्यामुळे विचारपूर्वक आणि दूरदृष्टी ठेवून कायदे निर्माण केले जातात. शेजारी राष्ट्रातील लोकशाही कोसळत असताना  भारताची लोकशाही व्यवस्था अधिकाधिक परिपक्व  होत असल्याने जनतेचा आत्मविश्वास वाढला आहे.
महाराष्ट्र  विधानमंडळाची परंपरा गौरवशाली राहिली आहे. अनेक दिग्गज सदस्यांनी आपल्या कृतीतून या सभागृहांत मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र विधानमंडळात निर्माण झालेले अनेक कल्याणकारी कायदे देशपातळीवर स्वीकारले गेले, ही अभिमानाची बाब आहे. सामान्य  माणसाला सन्मान मिळवून देण्याचा विधानमंडळाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे, असेही श्री. वळसे-पाटील म्हणाले.
प्रारंभी विधानपरिषदेचे माजी सदस्य उल्हास  पवार यांनी श्री. वळसे-पाटील यांचा परिचय करुन दिला.

No comments:

Post a Comment