* विधानपरिषद इतर कामकाज
-- मुख्यमंत्री
नागपूर, दि. 14 : महामानव भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे
स्मारक व्हावे यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी आज विधानपरिषदेत 260 अन्वये प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतांना
सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू
मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या स्मारकाबद्दलची संकल्पना निश्चित करणे,
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्किटेक्टकडून त्याचा आराखडा तयार करुन घेणे व त्यानंतर
त्याची अंमलबजावणी करणे अशा तीन टप्प्यात या स्मारकाचे काम करण्यात येणार असल्याचे
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांनी दलित, शोषित घटकांसाठी केलेले कार्य मौलिक आहे. त्यांच्या विचाराने प्रेरित
होऊन लाखो अनुयायी त्यांनी मिळविले. देशात कायद्याचे राज्य प्रस्थापित करणाऱ्या
घटनेचे ते घटनाकार आहेत. भारतीय घटना ही जगातील मोठी साहित्य निर्मिती आहे. या
स्मारकाद्वारे त्या संविधानाचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा तसेच स्मारकातून
दलित, शोषित घटकांना प्रेरणा मिळून त्यांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी
स्फूर्ती मिळावी व विषमता नष्ट होण्यास मदत व्हावी असे स्मारकाचे स्वरुप असावे,
असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन
इंदू मिलची जागा स्मारकासाठी मिळावी, या मागणीसाठी शासनाने केंद्र शासनाकडे
सातत्याने पाठपुरावा केला होता. देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी याबाबत अत्यंत
सकारात्मक भूमिका घेतली. राज्यातील जनता, सर्वपक्षीय सदस्य यांनी सनदशीर मार्गाने
केलेल्या मागणीचा त्यांनी स्वीकार केला. याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे तसेच
या स्मारकासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचेच आभार मानले.
या स्मारकाचे स्वरुप कसे
असावे, त्यात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असावा व स्मारकाद्वारे डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांची स्मृति प्रेरणादायी ठरावी यासाठी चर्चेद्वारे आलेल्या सर्व सूचनांचा
अभ्यास केला जाईल. या स्मारकाचे पावित्र्य अबाधित रहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न
करुया, असेही त्यांनी सांगितले.
विधानपरिषद सदस्य सुभाष चव्हाण यांनी
म.वि.प. 260 अन्वये मांडलेल्या या प्रस्तावावरील चर्चेत महिला व बालविकास मंत्री
प्रा.वर्षा गायकवाड, विरोधी पक्षनेते विनोद तावडे तसेच सदस्य सर्वश्री दिवाकर
रावते, माणिकराव ठाकरे, हेमंत टकले, भाई जगताप, प्रकाश बिनसाळे, शरद रणपिसे,
जयदेवराव गायकवाड, आशिष शेलार, श्रीमती निलम गोऱ्हे, अलका देसाई, विद्या चव्हाण
आदींनी भाग घेतला
No comments:
Post a Comment