Wednesday, 9 January 2013

शासकीय योजनांमध्ये पुरस्कार प्राप्त तंटामुक्त गावांना प्राधान्य --जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर



           जळगांव, दि. 9 :- महात्मा गांधी तंटामुक्त  गाव मोहिमेत सहभागी होऊन पुरस्कार प्राप्त तंटामुक्त गावांना शासनाच्या विविध विकासात्मक योजना राबवितांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी दिली.
        जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज सकाळी आयोजित महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम 2012 – 13 च्या बैठकीत जिल्हाधिकारी राजूरकर बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक एस.जयकुमार, अप्पर जिल्हाधिकारी सोमनाथ गुंजाळ, डीवायएसपी विवेक पानसरे, पंढरीनाथ पवार, प्रकाश गायकवाड, प्रांताधिकारी तुकाराम हुलवळे, गणेश मिसाळ, सरकारी वकील ॲड. अतुल चव्हाण, विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी व्ही.ए.पाटील आदि उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी राजूरकर म्हणाले, जिल्हयातील जास्तीत जास्त गावे तंटामुक्त व्हावीत याकरिता प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी व पोलिस निरीक्षक यांनी परस्परांत समन्वय ठेवून काम करावे तसेच यावर्षी प्रत्येक पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या उद्दिष्टांची पूर्तता शंभर टक्के करण्याची सूचना त्यांनी केली. जिल्हयात ज्या 12 ग्राम पंचायती सदरच्या मोहिमेत सहभागी झालेल्या नाहीत त्या विषयी असलेल्या कारणांची चौकशी करुन खात्री करण्याची सूचना जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केली.
      पोलिस अधिक्षक एस. जयकुमार यांनी पोलिस स्टेशन निहाय देण्यात आलेल्या उद्दिष्टाची माहिती देऊन 300 पेक्षा जास्त गावे तंटामुक्त करण्याची सूचना केली. तसेच तंटमुक्त गांव समिती अध्यक्ष, सरपंच, समिती सदस्य यांना प्रोत्साहन देऊन गावे तंटामुक्त करावीत, अशी सूचना त्यांनी दिली. मागील वर्षी तंटामुक्त पुरस्कार प्राप्त गावांना बक्षीसांची रक्कम मिळाली का नाही याची माहिती घेण्याचे ही एस जयकुमार यांनी सांगितले.
       सदरच्या मोहिमेच्या सशस्वीतेसाठी सन 2012 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकामध्ये 40 ग्राम पंचायती बिन विरोध झाल्या, तसेच 160 गावांनी एक गाव एक गणपती मोहिमेत सहभाग घेतला असून गावांमध्ये शांतता प्रस्थापीत केली असल्याची माहिती एस.जयकुमार यांनी दिली.
        प्रारंभी जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी महात्मा गांधी तंटमुक्त गाव मोहिमेत जिल्हयातील 15 तालुके, 29 पोलिस स्टेशन अंतर्गत 1139 ग्राम पंचायती सहभागी झाल्याची माहिती दिली. तर 12 ग्रामपंचायतीनी मोहिमेत सहभागी होणार नसल्याचे माहिती त्यांनी दिली यामध्ये कंडारी (भुसावळ), बांभोरी प्रचा (धरणगांव), पंचक (अडावद), खिरोदा प्रथा, मस्कावद बु. मस्कावद खु. मांगा, थोरगव्हाण, उदळी बु, सावखेडा खु, सावखेडा बु, (सावदा पो. स्टे.) आदि गावांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment