Wednesday, 2 January 2013

सामाजिक सौहार्द व सलोख्यामुळे आर्थिक प्रगती शक्य -- मुख्यमंत्री

        मुंबई, दि. 2 : देश महाशक्तीशाली होत असताना समाजात एकसंधपणा टिकविण्याची गरज असून सामाजिक सौहार्द व सलोख्यामुळे आर्थिक प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
            बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्यावतीने सामाजिक सलोखा परिसंवादाचे रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. गृहमंत्री आर. आर. पाटील, मुंबई शहर पालकमंत्री जयंत पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार विनायक मेटे, मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, असगर अली इंजिनियर, फादर फ्रेजर मस्करन्स आदी यावेळी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले, धर्मव्यवस्था, जातीयवाद, भाषावाद याबाबत मतभेद होऊन सामाजिक सलोखा बिघडला तर स्वातंत्र्यपूर्वीची परिस्थिती ‍निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. काही विदेशी शक्तींकडून तसेच काही अंतर्गत सामाजिक विकृतींकडून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे प्रयत्न सतत होत असतात. यावेळी कायदा व सुव्यवस्था टिकविणे गरजेचे असते व तो टिकविण्यामध्ये पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते. दारिद्र्य निर्मूलन करुन देशात विकासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सामाजिक सलोखा निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
            सामाजिक सलोखा बिघडल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, एकजिनसी समाज निर्माण होणे ही काळाची गरज आहे, असे गृहमंत्री आर.आर.पाटील म्हणाले. या परिसंवादाच्या माध्यमातून माणसाची मनं व्यापक बनतील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
            सामाजिकदृष्ट्या सलोखा निर्माण करणे हे नवे आव्हान असल्याचे पालकमंत्री श्री.पाटील यांनी सांगितले. पोलिसांची ताकद वाढविण्यासाठी पोलिसांचे अधिकार वाढवावेत, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
            कायदा सक्षम असला तरी विचार सक्षम असायला हवेत. त्यासाठी समाज म्हणून सर्वांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली असल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले. सामाजिक बांधिलकीचा हा संवाद तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी याची सुरुवात शाळा, महाविद्यालये यामधून करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
            मुंबई पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, असगर अली ईंजिनियर तसेच फादर फ्रेजर मस्करन्स यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment