Friday, 18 January 2013

नागरिकांना जलद सेवा पुरविण्यासाठी ई-प्रशासन आवश्यक - मुख्य सचिव



            मुंबई, दि. 18: माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना जलद व पारदर्शक पद्धतीने सेवा देण्यासाठी ई-प्रशासनाचा जास्तीत जास्त वापर करण्याचे निर्देश मुख्य सचिव श्री. जयंत कुमार बाँठिया यांनी आज येथे दिले.
            शासनाच्या विविध विभागांच्या ई-प्रशासकीय सेवांचा लाभ उपलब्ध करून देणाऱ्या महाऑनलाईनच्या सायन येथील कार्यालयास श्री. बाँठिया यांनी आज भेट देऊन पाहणी केली. यावेळी माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल, महाऑनलाईनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतनाम सेठी आदी उपस्थित होते.
            भेटी दरम्यान मुख्य सचिवांनी माहिती तंत्रज्ञान विषयक आणि महाऑनलाईनतर्फे नागरिकांना उपलब्ध करून दिलेल्या सेवांबाबतचा आढावा घेतला. राज्य शासनाच्या ज्या विभागांनी आपली संकेतस्थळे अपडेट केलेली नाहीत त्यांची यादी करावी, ही संकेतस्थळे वेळच्यावेळी अपडेट राहतील याकडे लक्ष देऊन प्रत्येक विभागांची संकेतस्थळे परिपूर्ण व नागरीकांना हाताळण्यास सोपी होतील, यावर भर देण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी केल्या.  
            यावेळी महाऑनलाईनच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत विविध विभागांच्या कार्यपद्धतीची माहिती मुख्य सचिवांनी करून घेतली. श्री. सेठी यांनी महाऑनलाईनतर्फे विविध विभागांची करण्यात आलेली संकेतस्थळे आणि सेवांविषयक सादरीकरण केले.

No comments:

Post a Comment