Monday, 14 January 2013

एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी -- मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले



            जळगांव, दि. 14 :-  जिल्हयात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दिनांक 20 जानेवारी रोजी राबविण्यात येणार असून सदरच्या मोहिमेतंर्गत 4 लाख 18 हजार 23 बालकांना पोलिओ डोसेस देण्याचे नियोजन आहे. तरी यापैकी एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले यांनी केले.
         जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी आयोजित पोलिओ लसीकरण दक्षता पथक समन्वय समितीच्या बैठकीत श्रीमती उगले अधिका-यांना मार्गदर्शन करत होत्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, एनआरएचएमचे प्रकल्प समन्वय मनीष नंदनकर, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. मावळे, डॉ. बी. आर. पाटील, निवासी वैदयकिय अधिकारी डॉ. कारंदे, एस. टी. महामंडळ, बीएसएनएल आदि विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            व्हॅक्सीन डोसेस सुव्यवस्थित  राहण्यासाठी आईस पॅकची आवश्यकता असते व ते तयार होण्यासाठी अखंडित वीजेचा पुरवठा आवश्यक असल्याने मोहिमेच्या एक दिवस आधी व मोहिमेच्या दिवशी वीज वितरण विभागाने अखंडित वीज पुरवठा करण्याची सूचना श्रीमती उगले यांनी वीज वितरण विभागाच्या अधिका-यांस केली. तसेच एकही मुल  पोलिओ लसीकरण विना रहाता कामा नये, सर्व बालकांना पोलिओ डोस देण्यात यावे असे त्यांनी बैठकीत  सांगितले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम जिल्हयात यशस्वी होण्याकरिता आरोग्य विभागास जिल्हयातील दूरसंचार विभाग, राज्य परिवहन विभाग, अंगणवाडी,  आकाशवाणी, माहिती कार्यालय, आर. टी. ओ., खाजगी रुग्णालये, शिक्षण विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, पोलीस विभाग, होमगार्ड व एन. जी. ओ. विभाग आदिंनी सहकार्य करण्याची सूचना शितल उगले  यांनी केली.
 जिल्हयात 0 ते 5 वयोगटातील सुमारे 4 लाख 18 हजार लाभार्थ्याना पोलिओ डोसेस देण्याचे नियोजन असून त्याकरिता 2 हजार 301 लसीकरण केंद्र, 6 हजार 342 मनुष्यबळ लसीकरण  केंद्रासाठी 506 पर्यवेक्षक, 205 मोबाईल टीम व रात्रीसाठी 10 टीम आदि तयारी आरोग्य विभागाकडून करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजीराव पवार  यांनी बैठकीत दिली.
            सदरच्या मोहिमेकरिता आयएलआर 175 लहान, 4 मोठे, डिक्रिमर 121 लहान, 14 मोठे, कोल्ड बॉक्स 130, व्हॅक्सीन   कॅरियर 2732, आईस पॅक 15,500 , व्हॅक्सीन थर्मामीदर 188, व्हॅक्सीन डोसेस 650000   वाहने 84 आदि साधन सामुग्री उपलब्ध झाली असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली.
            जिल्हयातील 0 ते 5 वयोगटातील  प्रत्येक बालकाला पोलिओ डोसेसचा लाभ मिळावा याकरिता एस. टी. स्टॅन्ड, रेल्वे स्थानक, खाजगी वाहतुक केंदे, बाजार, यात्रेच्या ठिकाणी, फिरते लसीकरण पथके, नर्सिग होम, मजूर वस्तीच्या ठिकाणी ट्रान्सीट टीम आदि  प्रकारे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी तर अति जोखमीच्या भागात आयपीपीआय मध्ये लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. सदरची मोहिम ही  20 जानेवारी व 24 फेब्रुवारी 2013 या दिवशी जिल्हयात सर्वत्र राबविण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment