Saturday, 12 January 2013

जागृत नागरिकांची भूमिका बजावण्याचा संकल्प करुन जाणीव जागृती अभियानाचा समारोप

       जळगांव, दि. 12 :-  महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हयात दिनांक 3 ते 12 जानेवारी 2013 या कालावधीत राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जाणीव जागृती अभियान राबविण्यात आले. सदरच्या अभियानाचा समारोपाच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व नागरिक, विद्यार्थी व‍ विशेषत: युवकांनी जागृत नागरिकांची भूमिका बजावून आपले कर्तव्य पार पाडण्याचा संकल्प केला.
            यावेळी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर , मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती सौ. लताबाई सोनवणे, महानगर पालिकेचा बाल कल्याण सभापती सौ. लताताई भोईटे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी देवेंद्र राऊत, बाल प्रकल्प अधिकारी  राजेंद्र शिसोदे, पोलिस निरीक्षिक वाय. डी. पाटील,  नेहरु युवा केंद्राचे समन्वयक अतुल निकम, सुनिल पंजे उपस्थित होते.
           प्रारंभी शाहीर शिवाजीराव पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांची महती सांगणारा व बाल शिवाजी ते राज्यकर्ते शिवाजी यांच्या जडण घडणीत जिजाऊंची भूमिका सांगून स्त्री शक्तीचे महत्व पटविणारा बहारदार पोवाडा सादर करुन समारोपाच्या कार्यक्रमास सुरुवात केली . त्यानंतर सभापती सौ. लताताई सोनवणे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तर सौ. लताताई भोईटे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्याप्रमाणेच 12 जानेवारी हा युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केले.
           जाणीव जागृती अभियानानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण दिशा बहुद्देशिय  संस्थेचे विनोद ढगे व इतर कलाकारांनी केले. यामध्ये नूतन महाविदयालयाच्या कलाकारांनी सादर केलेली व समाज  व्यवस्थलेला महिलांवरील अत्याचारासंबंधी प्रश्न विचारणारी  खेळ मांडिला . . . ही नृत्य नाटिका उपस्थितांना विचार करायला लावणारी ठरली. तसेच विनोद ढगे व त्यांच्या कलाकारांनी सादर केलेले स्त्री भ्रुणहत्या प्रतिबंध विषयक जनजागृती नाटय  अत्यंत मार्मिक ठरले. यात आजच्या समाज व्यवस्थेत स्त्री जन्मापासून ते दिल्ली येथे घडलेल्या महिला अत्याचारा पर्यंतच्या घटनांचा उहापोह करुन अशा घटना होऊ नयेत म्हणून शासनाचे प्रयत्न तर सुरु आहेत पण लोकांनीही याकरिता पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले.
                सदरचा कार्यक्रम जिल्हा महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नटराज हॉल येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला होता.
               या  कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी, सामाजिक संस्था व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.                      

No comments:

Post a Comment