Thursday, 3 January 2013

आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराकरिता सुधारित नियमावली



मुंबई, दि. 3 : महाविद्यालयीन, विद्यापीठ, अभियांत्रिकी शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण/ प्रशिक्षण, चित्रकला/ उपयोजित कला या क्षेत्रात अध्ययन किंवा अध्यापनासह शैक्षणिक क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा यथोचित गौरव व्हावा, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत राज्यातील शिक्षकांचा आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. या पुरस्कारांकरिता होणारी शिक्षकांची निवड अधिक पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण व्हावी, यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या नियम, निकष आणि निवड प्रक्रियेत सुधारणा करुन अद्ययावत नियमावली दिनांक 26 डिसेंबर 2012 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.
आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारांची एकूण संख्या 31 असून प्रत्येक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पारंपारिक महाविद्यालयातील (खासगी/ अनुदानित/विनाअनुदानित) शिक्षकांकरिता प्रत्येक विद्यापीठाकरिता प्रत्येकी एक पुरस्कार, उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत येणारी राज्यातील शासकीय महाविद्यालये, शासकीय शैक्षणिक संस्था, अध्यापक महाविद्यालये येथील शिक्षकांकरिता एक पुरस्कार, तंत्र शिक्षण संचालनालायांतर्गत येणारी राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालये, स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविद्यापीठ लोणेरे येथील शिक्षकांकरिता दोन पुरस्कार तसेच या संचालनालयांतर्गत येणारी राज्यातील सर्व शासकीय तंत्रनिकेतने, स्वायत्त तंत्रनिकेतने येथील शिक्षकांकरिता 3 पुरस्कार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) शिक्षकांकरिता आणि व्यवसाय शिक्षण संचालनालयातील (तंत्रशाळा) शिक्षकांकरिता महसूल विभाग निहाय प्रत्येकी एक असे एकूण बारा पुरस्कार, कला शिक्षण संचालनालयांतर्गत येणाऱ्या राज्यातील शासकीय व अनुदानित चित्रकला / उपयोजित कला महाविद्यालयातील शिक्षकांकरिता एक पुरस्कार, असे पुरस्कार देण्यात येतील.
प्राथमिक अटी व निकष यांचे पालन करणाऱ्या शिक्षकांनाच आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार देण्यात येतील. एखाद्या वर्षी प्राथमिक अटी व निकषांची पूर्तता होत नसल्यास त्या वर्षी त्या प्रवर्गात पुरस्कार दिला जाणार नाही.
शिक्षक पुरस्काराकरिता प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी संचालक व विद्यापीठ स्तरावर  छाननी समिती गठीत करण्यात आली असून प्रत्येक संचालनालय आणि विद्यापीठ यांच्याकडे प्राप्त होणारे सर्व प्रस्ताव, संचालक आणि कुलगुरु त्यांच्या स्तरावर गठीत करण्यात आलेल्या छाननी समितीपुढे ठेवतील. छाननी समिती प्रस्ताव तपासून मुल्यांकन करील. विद्यापीठाकडे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पारंपरिक महाविद्यालये (अनुदानीत / विनाअनुदानीत/ खासगी) आणि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शासकीय महाविद्यालये, शासकीय संस्था येथील शिक्षक, असे दोन प्रकारचे प्रस्ताव येतील. या दोन्ही प्रकारचे प्रस्ताव संबंधित कुलगुरु त्‍यांच्या स्तरावर गठित झालेल्या समितीपुढे ठेऊन स्वतंत्रपणे तपासून मुल्यांकन करतील.
आदर्श राज्य शिक्षक पुरस्कारार्थींची अंतिम निवड करण्याकरीता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवड समिती स्थापन करण्यात आली असून उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री हे उपाध्यक्ष, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे  प्रधान सचिव, राज्यातील दोन मान्यवर शिक्षण तज्ज्ञ आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सहसचिव (प्रशासन) हे सदस्य असतील. तर संचालक, उच्च शिक्षण हे सदस्य सचिव  असतील.
दहा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ आणि राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष  किंवा उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र असे आदर्श राज्‍य शिक्षक पुरस्काराचे स्वरुप आहे.
हा शासन निर्णय शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. 201212271431256308 असा आहे.

No comments:

Post a Comment