मुंबई, दि. 4 : पर्यटनाबरोबरच कोकणचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी कोकणातील आमदारांची लवकरच बैठक घेण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
गोरेगाव येथे कोकण भूमी प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित केलेल्या ‘ग्लोबल कोकण महोत्सवाचे उदघाटन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते, त्यावेळी ते बोलत होते. जगभरातील कोकणवासियांनी एकत्र यावे आणि कोकणात आर्थिक गुंतवणूक करावी. त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य शासन करील, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सागरी पर्यटन, डॉल्फिन सफारी, स्नॉर्केलिंग व बीच टुरिझम, बॅकवॉटर टुरिझम, कृषी व ग्रामीण पर्यटन, सह्याद्रीतील इको टुरिझम, ऍ़डव्हेंचर टुरिझम, जंगलसफारी असे रोजगाराचे असंख्य विषय कोकणात निर्माण करता येतील.
कृषीच्या दृष्टीने कोकण हा सर्वात समृद्ध प्रदेश आहे. संपूर्ण जगाला मोहवणारा हापूस आंबा फक्त रत्नागिरी आणि सिंदुधुर्ग जिल्ह्यात पिकतो. आज हापूसची एक हजार कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल आहे. शेतकऱ्यांना योग्य मार्केटिंग, तंत्रज्ञान, प्रशिक्षणाची जोड दिली तर ही अर्थव्यवस्था प्रचंड वाढू शकते. नारळ, मसाल्याची पिके, काजू, कोकम,फणस, केळी, अननस, वनौषधी अशी सर्व श्रीमंत पिके कोकणची आहेत. कोकणातील शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. कृषी पर्यटन हे कोकण विकासाचे मूलमंत्र आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. फळप्रक्रिया, मत्स्योद्योग, बंदर उद्योग, बायो टेक्नॉलॉजी, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी असे अनेक विषय कोकणच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. पर्यटनातून आणि अशा उद्योगातून तरुणांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. पाश्चात्य देशात मोठमोठ्या कंटेनरची वाहतुक ही रेल्वेद्वारे केली जाते, मात्र आपल्या देशात रस्त्यावरुन केली जाते. यामुळे रस्तेही मोठ्याप्रमाणात नादुरुस्त होतात शिवाय अपघातांची संख्याही वाढत जाते. हे टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोकणातील शेती, मसाला पिके, मत्स्यव्यवसाय, फळप्रक्रिया उद्योग, पर्यटन यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कोकणातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन निसर्ग समृध्द कोकणाला आर्थिक दृष्टया समृध्द करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोकणाच्या विकासातून राज्याला भरपूर प्रमाणात महसूल प्राप्त होईल यासाठी नवीन पिढीची मानसिकता बदलल्यास भावी काळात ही तरुण पिढी उद्योगाकडे आकर्षित होईल.
कोकणाला प्रदूषणाची झळ न लागता नवीन उद्योग धंदे उभारण्यात यावेत तसेच कोकणाचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास व्हावा याकरिता लोकांना माफक दरात पर्यटन सुविधा उपलब्ध झाल्यास पर्यटकांचा ओढा कोकणाकडे निश्चित प्रमाणात वाढेल अशी आशा मुख्यमंत्री चव्हाण यांनी शेवटी व्यक्त केली.
समतोल नियोजन करण्याची गरज.
कोकण हा देशाच्या अर्थसत्तेचा केंद्रबिंदू बनू पाहत असताना सर्व मतभेद विसरुन आपण सर्वांनी एकत्रितपणे कोकणातील निसर्ग सौंदर्य, बंदरे, उद्योग व उद्योजक यांना जागतिक व्यासपीठ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली.
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झाल्यानंतर तारकर्ली बंदराचा विकास, स्कूबा डायव्हिंग, डेक्कन ओडिसी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिझॉर्टस्, पॅकेज टूर्स, कोकण रॉयल ही अत्याधुनिक आरामदायी बस सेवा या माध्यमातून कोकणच्या पर्यटनाला फार मोठया प्रमाणात चालना देण्यात आल्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
कोकणात पायाभूत सुविधाचा मोठया प्रमाणावर विकास होणे गरजेचे असल्याने कोकणाच्या विकासासाठी अर्थ संकल्पात विशेष तरतूद करण्यात येणार आहे. तसेच जागतिक नकाशावर कोकणाचे स्थान अधोरेखित करण्याठी सिंहावलोकन करण्याची गरज असल्याचे रायगडचे पालक मंत्री तथा जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितले. संपूर्ण सागरी जीवन दाखविणारे मत्स्यालय व कोकणी खाद्य संस्कृतीचा मत्स्य महोत्सव हे या महोत्सवात मोठे आकर्षण आहे. कोकण खजिना, कोकणी उद्योजक दालन, कोकणातील निर्सग सौंदर्य छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन, कोकणातील कृषी पर्यटन व ग्रामीण पर्यटनाच्या माहितीचे स्टॉल्स्, येथील महान साहित्यिकांच्या पुस्तकाचे भांडार,कोकणात गुंतवणूक व प्रकल्प उभारण्यासाठी तज्ज्ञांकडून माहिती या महोत्सवात प्रदर्शित करण्यात आली आहे.
ग्लोबल कोकण महोत्सवाचे आयोजक संजय यादवराव यावेळी बोलताना म्हणाले की, कोकणातील कृषी उद्योग, पर्यटन, करमणूक आणि बांधकाम क्षेत्र यामध्ये ‘कोकणाला असणाऱ्या संधी’ याबाबत महोत्सवात चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आमदार सर्वश्री भाई जगताप, श्रीमती विद्या चव्हाण तसेच माजी मुख्य सचिव द.म. सुकथनकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कोकण भूमी प्रतिष्ठान तर्फे पर्यटन डायरीचे प्रकाशन केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कोकण आयडॉल्स पुरस्काराचे वितरण यावेळी मुख्यमंत्र्याच्या हस्ते करण्यात आले.
* * * * * * *
No comments:
Post a Comment