Monday, 21 January 2013

कृषि विभागांकडून जिल्हयात निविष्ठा सर्वेक्षण होणार



       जळगांव दि. 21 :- जिल्हयात निविष्ठा सर्वेक्षण कामाचा सन 2011 – 12 या संदर्भ वर्षासाठी विविध गटातील शेतक-यांकडून निविष्ठांचा होणारा वापराबाबतचा अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती उप आयुक्त (कृषि गणना ), कृषि आयुक्तालय, पुणे यांनी दिली आहे.
        सदर सर्वेक्षणांतर्गत गावांमधील शेतक-यांकडे शेती निविष्ठा वापरण्याच्या पध्दतीचा अभ्यास करुन निविष्ठांचे उत्पादन, आयात व वाटप आदिचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच शेतक-यांच्या अत्यल्प, अल्प, मध्यम व मोठे या गटातील शेतक-यांचा निविष्ठांच्या वापराबाबतची माहिती घेणे. त्याप्रमाणेच रासायनिक खतांचा वापर, एकात्मीक किड व्यवस्थापन, अधिक उत्पन्न देणा-या वाणांचे बियाणे, शेणखत/ कंपोष्ट खत, जैविक खते, औषधे, कृषि अवजारे, यंत्र सामुग्री, जनावरे (पशूधन ) व कृषिपत पुरवठा आदि कृषि संबंधी निविष्ठांच्या वापराबाबतच्या माहितीचा अभ्यास करुन नियोजन करण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
      सर्वेक्षणातून मिळणारी माहिती इतर कोणत्याही कारणासाठी वापरली जाणार नसून ती केवळ सांख्यकीच आकडेवारी व अभ्यासाकरिता उपयोगात आणली जाणार आहे. शेतक-यांच्या अत्यअल्प, अल्प, निममध्यम , मध्यम व मोठे शेतकरी या गटांतून प्रत्येकी 4 शेतक-यांची ढोबळ मानाने प्रत्येक गावांमधून माहिती घेतली जाणार असल्याचे कृषि उपायुक्त यांनी सांगितले.  
        राज्यातील एकूण गावांपैकी 7 टक्के गावांमध्ये कृषि विभागामार्फत सर्वेक्षण केले जाणार असून सदरच्या सर्वेक्षणातून अचूक माहिती मिळावी या करिता गावांमधील शेतक-यांनी कर्मचारी / अधिकारी यांनी सहकार्य करण्याचे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment