Thursday, 10 January 2013

टंचाई निवारण्यासाठी लोकप्रतिनिधी व पदाधिका-यांच्या सूचनांवर अधिका-यांनी त्वरित कार्यवाही करावी - पालकमंत्री ना. देवकर



                    जळगांव, दि. 10 :- लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांनी टंचाई आढावा बैठकीत टंचाई निवारण्यासाठी करण्यात आलेल्या सूचनांवर सर्व संबंधित अधिका-यांनी त्वरित कार्यवाही करावी. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांमधील पाण्याचा प्रश्न सोडविला जाऊन पुढील काळात टंचाई भासणा-यां गावांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले.
             अंमळनेर, पारोळा व एरंडोल या तिन्ही तालुक्यांच्या पाणी टंचाई आढावा बैठकीत    ना. देवकर  बोलत होते. यावेळी आमदार साहेबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर , मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, प्रांताधिकारी तुकाराम हुलवळे, अंमळनेर नगराध्यक्षा  जयश्रीताई पाटील, तिलोत्तमा पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. स्मिताताई वाघ, अंमळनेर तहसिलदार प्रमोद हिले, पारोळा तहसिलदार सुधीर कोळी, पारोळा गट विकास अधिकारी  श्री. सोनवणे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, उप अभियंता सोनवणे, वरिष्ठ भू – वैज्ञानिक श्री. वाघमारे, अंमळनेर मुख्याधिकारी सोमनाथ शेटे, पारोळा व एरंडोल मुख्याधिकारी किरण देशमुख आदि उपस्थित होते.
             पालकमंत्री ना. देवकर यांनी आज अंमळनेर, पारोळा व एरंडोल या तीन तालुक्यातील पाणी टंचाईचा गाव निहाय आढावा  त्या – त्या तालुक्यात जाऊन घेतला. यावेळी वरील तालुक्यांमधील नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे सदस्य यांनी गावांमधील पाणी टंचाईची परिस्थिती सांगून त्यावर नवीन विहीर घेणे, विहीर खोलीकरण, पाईपलाईन दुरुस्ती, तापी नदीवरुन पाणी आणणे, विहीरीत आडवे बोअर घेणे, बोरी नदीतून पाण्याचे आवर्तन सोडणे, शहरातील बोगस नळ कनेक्शनवर कारवाई करणे, अंमळनेर शहराला पाणी पुरवठा व्हावा  म्हणून बोरी  नदी येथे नवीन बंधारा टाकणे, विहीर व बोअर अधिग्रहीत करणे आणि टँकरने पाणी पुरवठा करणे आदि उपाय योजना राबविण्याची मागणी केली.
              ना. देवकर पुढे म्हणाले सर्व संबंधीत तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी टंचाईच्या उपाय योजना संबंधीचे प्रस्ताव तात्काळ पाठवावेत . तसेच सदरच्या प्रस्तावांच्या मंजरीसाठी पाठपुरावा करण्याच्या सूचना करुन  टंचाईच्या गावांची पाहणी करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
               ज्या गावांना सध्या पाणी टंचाई भासत नाही परंतू मार्च – एप्रिल नंतर टंचाई भासू शकते, अशा गावांनी विहिर अधिग्रहीत करणे, नवीन बोअर व टँकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव तातडीने देऊन सदरच्या उपाय योजना मंजूर करुन घ्याव्यात . सदरच्या उपाय योजनांच्या प्रस्तावांना गट विकास अधिकारी व तहसिलदार यांनी आठ दिवसात मंजूरी देण्याचे आदेश ना. देवकर यांनी दिले.
              वीज वितरण कंपनीने पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन सदरच्या गावांनी चालू बील भरले असल्यास तोडू नयेत. असे ना. देवकर यांनी सांगितले. सर्व ग्रामपंचायतीनी गावांमधील लोकांकडे थकीत असलेली पाणीपट्टीची वसूली करावी व लोकांनी ही पाणीपट्टी भरुन पुढील योजना राबविण्यासाठी सहकार्य करण्याची सूचना ना. देवकर यांनी केली. पाणी पट्टी भरणे हे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
              यावेळी ना. देवकर यांनी भोकरबारी ( ता. पारोळा ) येथील पाणी पुरवठा योजनेची चौकशी करणे व पिंपळकोठा ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची सूचना केली. तसेच धरणे /  प्रकल्प व कालव्यातून अनाधिकृत पाणी उचलणा-या शेतक-यांच्या मोटारी जप्त करण्याचे आदेश संबंधीत अधिका-यांना ना. देवकर यांनी  दिले.
                  यावेळी आमदार साहेबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांनी आपआपल्या विधानसभा मतदार संघातील टंचाईग्रस्त गावांसाठी विविध उपाय योजना तात्काळ करण्याची मागणी केली. तसेच संबंधित अधिका-यांनी टंचाईच्या कामांना प्राधान्य देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तर जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर व सीईओ शीतल उगले यांनी सर्व अधिकारी व पदाधिकारी यांनी परस्परांत समन्वय ठेवून कामे करण्याच्या सूचना दिल्या.
               या बैठकीत तीनही तालुक्यांतील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सर्व गावांमधील सरपंच,ग्रामसेवक व तलाठी  मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment