Thursday, 24 January 2013

बालकवी ठोंबरे स्मारकाचे हस्तांतरण स्मारक समितीकडे होईल पालकमंत्री ना. देवकर



           जळगांव, दि. 24 :- बालकवी ठोंबरे स्मारकाचे काम पूर्ण झाल्यानंतर स्मारकाच्या देखभाल व दुरुस्तीकरिता धरणगांव शहरातील मान्यवर व्यक्ती, पत्रकार, साहित्यिक आदिंची एक समिती स्थापन करुन सदरच्या स्मारकाचे हस्तांतरण स्मारक समितीकडे करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री  ना. गुलाबराव देवकर यांनी दिली.
           धरणगांव शहरात (दि. 23 जानेवारी रोजी ) आयोजित बालकवी ठोंबरे स्मारक आढावा बैठकीत  ना. देवकर बोलत हाते. यावेळी नगरसेवक दीपक वाघमारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस. पाटील , उपअभियंता रामकृष्ण सुरवाडे आदिसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
         ना. देवकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागांच्या अधिका-यांकडून स्मारकाच्या कामाविषयी माहिती घेतली. तालुका क्रीडा संकुलाच्या समोरील तीन एकर पेक्षा अधिकच्या जागेवर बालकवींचे भव्य स्मारकाची वास्तु उभारण्यात येणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. यामध्ये सहाशे प्रेक्षक क्षमता असलेले एक ऑडिटिरियम , वास्तु, बालकवी ठोंबरे यांचे शिल्प असणार आहे. सदरच्या जागेत सध्या कंपाऊंड वॉलच्या कामास सुरुवात झाली असून दोन – तीन टप्प्यात कामे पूर्ण केली जातील अशी माहिती श्री. पाटील यांनी दिली.
          जिल्हा नियोजन समितीमध्ये सदरच्या स्मारकांकरिता सुमारे साडेतीन कोटी रु. मंजूर झालेले असून धरणगांव शहरात बालकवी ठोंबरे यांचे एक दर्जेदार व भव्य स्मारक उभारले जाऊन सदरच्या स्मारकाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने 90 टक्के काम पूर्ण केल्यानंतर स्मारक समितीकडे स्मारकाचे हस्तांतरण केले जाईल, असे ना. देवकर यांनी सांगितले. सदरच्या समितीमध्ये धरणगांव शहरातील साहित्यिक, कलाकार, पत्रकार आदि मान्यवरांचा सहभाग असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
                              उपोषण सोडण्याचे आवाहन
        धरणगांव नगरपलिकेचे सेवानिवृत्त कर्मचा-यांना जुलै 2012 पासून निवृत्तीवेतन मिळाले नसल्याने सदरचे कर्मचारी उपोषणावर आहेत. अशा कर्मचा-यांशी ना. देवकर यांनी भेट घेऊन राज्य शासनाकडून देण्यात येणारा निधी लवकरच नगरपालिकेला मिळेल तसेच नगरपालिकेने ही त्यांचा निधी दयावा, असे सांगितले. मागील सहा महिन्यांपासून थकीत असलेले सर्व कर्मचा-यांचे निवृत्तीवेतन लवकर मिळेल त्यामुळे कर्मचा-यांनी उपोषण सोडण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी नगरपालिका मुख्याधिकारी श्रीमती प्रतिभा पाटील उपस्थित होत्या.                       

No comments:

Post a Comment