Saturday, 5 January 2013

धरणगांव येथे जिल्हाधिका-यांच्या हस्ते शालेय दाखल्यांचे वाटप

                जळगांव, 5 :- सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत शालेय विदयार्थ्यांना शाळेतच विविध दाखले देण्याचा कार्यक्रम सुरु झाल्याने विदयार्थी / पालक यांना दाखले मिळवितांना येणा-या अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे विदयार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रम यशस्वीतेने पूर्ण करण्यासाठी लक्ष घालण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केले. ते धरणगांव येथील बालकवी ठोंबरे विदयालयातील विदयार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
        यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, प्रांताधिकारी रविंद्र राजपूत, मुख्याध्यापक एस. एस. पाटील, तहसिलदार महेंद्र पवार, संस्थेचे चेअरमन डी. डी. कुडे आदि उपस्थित होते.
         तहसिलदार महेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात सन 2011-12 मध्ये शाळेतील 729 विदयार्थाना रहिवाशी, राष्ट्रीयत्व व जातीच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आलेले असून आज इयत्ता 8 वी च्या विदयार्थ्यांना 407 शालेय दाखले दिले जातील असे सांगितले . तर प्रांताधिकारी रविंद्र राजपूत यांनी शासनाने विदयार्थ्यांसाठी सुवर्ण जयंती राजस्व अभियानातून शालेय दाखले वाटपाचा कार्यक्रम सुरु केला असून त्याअंतर्गत जळगांव प्रांतमध्ये हजारो दाखल्यांचे विदयार्थ्याना शाळेतच वाटप केल्याचे सांगितले. त्यामुळे दाखले वाटपात होणारी दिरंगाई व शासकीय कार्यालयात होणारी गर्दी कमी झाली असून विदयार्थ्यांनाही त्यांच्या शिक्षणासाठी लक्ष देता येत असल्याचे सांगितले. तसेच पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेश घेणे सुलभ होणार आहे.
         मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले यांनी उपस्थित सर्व विदयार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशेष्त : मुलींनी शिक्षणात जास्तीत जास्त लक्ष घालण्याची सूचना त्यांनी केली.   संस्थेचे चेअरमन  श्री. डी. डी. कुडे यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त  करतांना शाळेतच दाखले देण्याचा हा चांगला उपक्रम असल्याचे सांगितले.
          प्रारंभी जिल्हाधिकारी  राजूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी उगले यांच्या हस्ते विदयार्थ्याना प्रातिनिधक स्वरुपात शालेय दाखले वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. पी. पाटील यांनी तर श्री. पवार यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment