Thursday, 3 January 2013

रस्ता सुरक्षेबाबत गंभीर विचार करणे आवश्यक - मुख्यमंत्री

रस्ता सुरक्षेबाबत गंभीर विचार करणे आवश्यक - मुख्यमंत्री
          मुंबई, दि.3 : रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत केवळ पंधरवडाच साजरा न करता रस्ता सुरक्षेबाबत गंभीर विचार करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले. परिवहन विभाग, पोलीस विभाग व वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर.आर.पाटील, ग्रामविकास मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री जयंत पाटील, परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. अमिताभ राजन, पोलीस महासंचालक संजीव दयाल, परिवहन विभागाचे प्रधान सचिव डॉ.शैलेशकुमार शर्मा, मुंबई पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह, वेस्टर्न इंडियाचे नितिन दोसा, पॅरीस येथील रस्ता सुरक्षा तज्ज्ञ श्रीमती बर्ग आदि मान्यवर उपस्थित होते.
            मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मोटार वाहनांमुळे होणारे अपघात टाळणे ही जबाबदारी शासनाच्या एका विभागाची नसून सर्व विभागांची आहे.  तसेच रस्त्यांचा वापर करणाऱ्या वाहनचालकांची, पादचाऱ्यांची व सर्व संबंधित घटकांचीही आहे म्हणून सर्वांनी याचे भान ठेवणे आवश्यक आहे. नेमेची येतो पावसाळा याप्रमाणे केवळ अभियानापुरते आपण सतर्क न होता पुढेही सतर्क राहणे आवश्यक आहे.
            रस्ता सुरक्षेबाबत आतापर्यंत नेमलेल्या सर्व समित्यांच्या निकर्षातील तातडीने व सहजतेने अंमलात आणावयाच्या सूचना एक महिन्यात परिवहन व पोलीस विभागाने एकत्रितपणे माझ्यासमोर आणाव्यात व त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करावेत, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. यात प्रामुख्याने अपघात ठिकाणांची निश्चिती व उपाय, रस्ता सुरक्षेसाठी एक टक्का निधीची योजना अशा सूचनांचा समावेश आहे.  तसेच वाढणारी वाहन संख्या व वाहन चालविण्याचा परवाना देण्याची पध्दत अधिक कडक करणे असे  चिंतेचे विषय असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे हेल्मेट सक्ती, विनापरवाना वाहन चालविणे याकडेही लक्ष देण्याची गरज असून वाहनांबरोबरच प्रदूषणाचाही विचार व्हावा असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  तथापि, नव वर्षात या सर्वांचा विचार होऊन रस्ते अपघाताबाबत सतर्क राहू अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. `जीवन सांभाळा : दारु  पिऊन  गाडी  चालवू  नका`  असे  घोषवाक्य  या  पंधरवड्याचे आहे.                                                                       
            रस्ता सुरक्षा संदर्भात करावयाच्या उपाय योजनांसाठी निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. जीव महत्त्वाचा असल्याने अपघात होऊ नये यासाठी सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवाव्यात. काही भागातील ऑटो, जीप मध्ये प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांना बसवून त्यांच्या जीवांशी खेळण्याचा प्रकार होतो. अशा भागातील पोलीस अथवा संबंधितांनी कडक कारवाई करावी. तसे न झाल्यास प्रसंगी संबंधित यंत्रणेवरच कारवाई करावी लागेल, असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या खास शैलीत रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत समर्पक अशा सूचनाही दिल्या.
            देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह सुरु असून आपण मात्र राज्यात पंधरवडा साजरा करतो. आपण अधिक सतर्क राहतो.  या सतर्कतेमुळे गतवर्षीपेक्षा कमी अपघात झाल्याने आपण यशस्वी ठरलो असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी यावेळी सांगितले.                                                                                                  
            दारु पिऊन गाडी चालविण्याच्या विरुध्द केलेल्या मोहिमेत सापडलेल्यांचे परवाने रद्द केले असून दंड ठोठावले. परंतु याबाबतचे कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. रस्ता सुरक्षेबाबत प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.                                                                                          
            तर वाहन चालविण्याचा परवाना देताना अधिक कडक नियमावली असावी. त्यामुळे वाहनचालकाचा दर्जा अधिक सुधारेल तसेच महत्वाच्या सिग्नलवर सी. सी. टी. व्ही. आणि पादचाऱ्यांसाठी रस्ता राखीव ठेवणे आदी बाबींवर विचार करावा, असे मत मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
            आपल्या प्रास्ताविकातून परिवहन विभागाचे प्रधान सचिव डॉ. शैलेश कुमार शर्मा यांनी रस्त्यांवरील अपघातांची आकडेवारी  मांडली व परिवहन विभागामार्फत येणाऱ्या विविध उपक्रमांच्या उपाययोजनांची माहिती दिली.
            यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षेबाबतच्या सी.डी.चे व वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या वतीने तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. परिवहन आयुक्त वि. ना. मोरे व सह पोलीस आयुक्त (वाहतूक) विवेक फणसळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.  या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील नागरिक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* * * * * * *

No comments:

Post a Comment