मुंबई, दि. 2 : संसदीय
कामकाजातून जनतेचे प्रश्न सोडविले जाऊ शकतात. अनेकदा काही प्रश्नांची उत्तरे
सभागृहामार्फत जनतेसमोर आणणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीचे असते. पण अधिकाधिक प्रश्न
अधिवेशनाच्या माध्यमानेच सोडविले जातात, असे वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण
केंद्राचे संचालक नागेश केसरी यांनी येथे सांगितले.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात
केंद्रातर्फे दोन संवाद व बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थी पत्रकारांबरोबर तीन
चर्चासत्र असे पाच कार्यक्रम झाले. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, मध्यंतरी
कॅगच्या कामकाजाविषयी माध्यमात बरीच प्रदीर्घ चर्चा झाली. कॅगचे काम कसे चालते
याची लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष संबंधित व्यक्तींमार्फत माहिती मिळावी. या
उद्देशाने या सत्रकाळात विधिमंडळ सदस्यांबरोबर कॅगचे प्रमुख महालेखाकार-2 यशवंत
कुमार यांच्याशी चर्चा झाली. त्यांनीही कॅगची माहिती पॉवर पॉईंटच्या माध्यमातून
विधिमंडळ सदस्यांना दाखविली. त्यांच्याशी सुसंवाद साधला व त्यांच्या शंकांचे निरसन
केले.
दुसरा संवाद अपर मुख्य सचिव, डॉ.
एस.के. गोयल यांच्याबराबर झाला. श्री. गोयल यांनी मंत्रालयाचे प्रशासन, विधिमंडळाच्या
संदर्भात कशाप्रकारे काम करते. लोकप्रतिनिधी आणि लोकसेवक यांची भूमिका काय ? आपल्या प्रश्नाच्या उत्तराचा मसुदा कसा तयार
होतो व एकूणच ही प्रक्रिया कशी चालते याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे संसदीय
कामकाजाचे महत्त्वही विशद केले, अशी माहिती श्री. केसरी यांनी दिली.
प्रत्येक
आठवड्यात एक याप्रमाणे दोन आठवड्यात दोन कार्यक्रम झाले असे सांगून श्री. केसरी
म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वृत्तपत्र विभागाचे
विद्यार्थी व प्राध्यापक तसेच वर्धा येथील यशवंत महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र
विषयाच्या 30 विद्यार्थ्यांनी उभय सभागृहाच्या कामकाजाचे जवळून अवलोकन केले आणि आपल्या
शंकांचे निरसन केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सभापती
शिवाजीराव देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद
तावडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे, प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे
त्यांच्याशी चर्चा करुन सविस्तर माहिती घेतली व शंकांचे निरसन केले.
प्रथमच ग्रामीण भागातून श्रमिक
पत्रकार विधिमंडळाचे अवलोकन करावयास आले. यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे
अध्यक्ष मनोज व्हटकर यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या 21 पत्रकारांनी सभागृहातील
वृत्तसंकलनाची माहिती घेतली व कामकाजासंदर्भात शंकांचे निरसन करुन घेतले, असेही
त्यांनी सांगितले.
या उपक्रमातून संसदीय लोकशाहीचे
महत्त्व, सभागृहाबाहेर विरोधी पक्षांचे होणारे आंदोलन, सभागृहाचे कामकाज
त्यामागच्या दोघांच्याही भूमिका विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या. हे एक संसदीय
लोकशाहीचे यशच असल्याची भूमिका श्री. केसरी यांनी मांडली.
संसदीय लोकशाही हा जगन्नाथाचा रथ आहे.
त्याला माध्यमाच्या सहकार्याची आणि मदतीची नितांत गरज असते. जनतेच्या भावना याच
माध्यमातून सर्वांसमोर जातात, त्यामुळे प्रसिद्धी माध्यमाने हे काम जबाबदारीने
करावे, असे आवाहनही नागेश केसरी यांनी यावेळी केले.
No comments:
Post a Comment