Friday, 4 January 2013

मुंबईची सर्वंकष माहिती देणारा `महाराष्ट्र अनलिमिटेड`चा मुंबई विशेषांक -छगन भुजबळ



मुंबई, दि. 4 : महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळातर्फे प्रकाशित होणाऱ्या महाराष्ट्र अनलिमिटेड या त्रैमासिकाच्या मुंबई विशेषांकामुळे मुंबईचा इतिहास, येथील पर्यटनस्थळे, किल्ले, समुद्र किनारे, हेरिटेज वास्तू यांची संपूर्ण माहिती देश आणि परदेशातील पर्यटकांना मिळेल, असा विश्वास पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी आज व्यक्त केला.
महाराष्ट्र अनलिमिटेड त्रैमासिकाच्या मुंबई विशेषांकाचे प्रकाशन आज श्री. भुजबळ यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.  त्यावेळी ते बोलत होते. पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगदीश पाटील, सहसंचालिका किशोरी गद्रे आणि या अंकाच्या संपादिका मंजिरी खांडेकर यावेळी उपस्थित होते.
श्री. भुजबळ म्हणाले, महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांना देण्याच्या उद्देशाने महामंडळाने सुरु केलेल्या या त्रैमासिकाचे पहिले दोन अंकही संग्राह्य असून  हे अंक देशविदेशातील टुर ऑपरेटर्सना पाठविण्यात येतात. या मुंबई विशेषांकात मुंबई गॅझेटीयर बरोबरच काही ऐतिहासिक दाखले व पुरावेही देण्यात आले असून मुंबईची सर्वंकष माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्रात अनेक निसर्गदत्त पर्यटनस्थळे आहेत. त्यांचा प्रचार व प्रसार करणे, ही पर्यटनस्थळे स्वच्छ ठेवणे, त्या ठिकाणी पर्यटकांना आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरविणे याकडे पर्यटन महामंडळाने लक्ष केंद्रीत केले आहे.
 राज्यातील पर्यटनस्थळांकडे राज्याबरोबरच देशातील आणि परदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी सांगताना श्री. भुजबळ म्हणाले की, बॉलिवूड टुरिझम हा नवीन पर्यटन प्रकार राज्यात सुरु करण्याचा विचार असून त्याचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम सुरु आहे. फिल्मसिटीची मान्यता मिळाली की, दर शनिवार, रविवार या टुर्स सुरु करण्यात येणार आहेत. कोकणातील पर्यटन वाढावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. सी वर्ल्डच्या प्रकल्पासाठी नियुक्त केलेल्या परदेशी  कंपनीने या प्रकल्पाचे पहिले सादरीकरण  नुकतेच केले असून त्याचा अंतिम प्रकल्प आराखडा लवकरच सादर होईल. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहिती देणारे सहा भाग  डिस्कव्हरी चॅनलने तयार केले आहेत.  मुंबईतील संजय गांधी उद्यानात वाहनांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी या उद्यानात फिरण्यासाठी हॉप ऑन आणि हॉप ऑफ या प्रकरच्या सीएनजीवर चालणाऱ्या बसेस सुरु करण्यासाठी  बेस्टने सहमती दर्शविली आहे. 
यावेळी डॉ. जगदीश पाटील म्‍हणाले, मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. मुंबई उपनगर आणि मुंबई शहर यांच्यासाठी वेगवेगळे आर्किटेक्ट नियुक्त करण्यात आले असून एक महिन्याच्या आत त्यांचा अहवाल येईल.

No comments:

Post a Comment