Sunday, 13 January 2013

धरणातील पाणी अनाधिकृतपणे उचलणा-या शेतक-यांवर कायदेशीर कारवाई करावी -- पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर

            जळगांव दि. 13:- जिल्हयातील टंचाईग्रस्त 12 तालुक्यापैकी जामनेर तालुक्यात टंचाईची परिस्थिती अतिशय भीषण असल्याने प्रशासनाने टंचाईच्या विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी तसेच तहसिलदार व गटविकास अधिकारी यांनी धरणातील आरक्षित पाण्याची चोरी करणा-या शेतक-यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी दिले.
            जामनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज सकाळी आयोजित टंचाई आढावा बैठकीत              ना. देवकर बोलत होते. यावेळी आमदार गिरीष महाजन, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, प्रांताधिकारी रविंद्र राजपूत, पंचायत समिती सभापती शेखर काळे, जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड, तहसिलदार शशिकांत मंगरूळे, गट विकास अधिकारी अजित पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक वाल्मिक पाटील, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, उप अभियंता पाटील, भूजल यंत्रणेचे वरिष्ठ वैज्ञानिक श्री. वाघमारे, जामनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी सतिष दिघे आदि उपस्थित होते.
            ना. देवकर पुढे म्हणाले, जिल्हयातील दुष्काळाची परिस्थितीवर प्रशासनाने उपाय योजना केलेल्या आहेत. तसेच शासनाने दि. 9 जानेवारी, 2013 च्या परिपत्रकान्वये टंचाईग्रस्त गावांना महसूलात सूट, वीज बिलात 67 टक्के माफी, विद्यार्थांना परिक्षा फी मध्ये माफी, शेती संबंधित कर्जवसुलीला स्थगिती आदि सवलती जाहिर केल्याची माहिती त्यांनी दिली.
            शासनाने पाणी टंचाई व चारा टंचाईवर मात करण्याबरोबरच दुष्काळग्रस्त भागातील बेरोजगारांना रोहयो अंतर्गत रोजगाराची उपलब्धता केली असल्याचे ना. देवकर यांनी सांगितले. महात्मा फुले जलभूमी अभियानातून तलावातील गाळ काढणे व दुरुस्ती करणे आदि कामे हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
            वीज कनेक्शन व वीजेच्या भारनियमानासंबंधी बहुतांश पदाधिका-यांनी पालकमंत्री यांचेकडे तक्रारी केल्या. परंतु बैठकीत संबंधित वीज कंपनीचे अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांना कराणे दाखवा नोटिस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना ना. देवकर यांनी दिले. तसेच पुढील टंचाई बैठकीस वीज कंपनीच्या अधिक्षक अभियंता यांना बोलावण्याची सूचना त्यांनी केली.  तसेच हातपंप दुरुस्ती करणारी गाडी फार जुनी झाली असून पदाधिका-यांनी नविन गाडीची मागणी केली. यावेळी ना. देवकर यांनी नियोजन समितीमधून हातपंप दुरुस्ती करण्यासाठी पाच गाडयांच्या खरेदी करिता जिल्हा परिषदेला निधी देण्यात आल्याचे सांगितले.                   
            प्रारंभी तहसिलदार शशिकांत मंगरुळे यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये त्यांनी जामनेर तालुक्यात 23 गावांना  19 टँकरने पाणी पुरवठा होत असून 30 गावांसाठी 32 खाजगी विहिरी अधिगृहीत केल्याचे सांगितले. तसेच तालुक्यात तीन तातडीच्या पाणी पुरवठा योजना सुरु केल्या असून 683 हात पंपापैकी चालू स्थितीत 304 हातपंप असल्याची माहिती त्यांनी दिली.  
            शेंगुळे गावांमधील महिलांनी बाटलीत गढूळ पाणी आणून बैठकीत ना. देवकर यांना दाखवले. तसेच नाचणखेडा येथील पाणी पुरवठा समितीच्या दप्तर हस्तांतरणावरुन दोन गटात वाद निर्माण होऊन बैठकीत गोंधळ झाला. त्यामुळे ना. देवकर यांनी याविषयी नाराजी व्यक्त करुन सदरची बैठक ही टंचाईची परिस्थिती जाणून उपाययोजना करण्यासाठी असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्व पदाधिका-यांनी शांतता ठेवून आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन केले. तसेच पदाधिका-यांनी टंचाईच्या परिस्थितीचे गांभीर्य  ओळखून आपल्या तक्रारी/ सूचना मांडण्याची सूचना त्यांनी केली.
            यावेळी आमदार गिरीष महाजन यांनी तालुक्यातील टंचाईची भीषणता कथन करुन उपाय योजना कार्यक्षमपणे राबविण्याची मागणी केली. या बैठकीत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच आदि पदाधिकारी यांचेसह ग्रामसेवक, तलाठी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment