Thursday, 3 January 2013

टंचाईवरील उपाय योजनांच्या प्रस्तावांना तात्काळ मान्यता द्यावी-. पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर


     जळगांव, दिनांक 3:- जिल्हयात पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झालेली असून मार्च- एप्रिल नंतर टंचाईची तीव्रता अधिक प्रमाणात जाणवेल.  त्यामळे टंचाई निवारण्यासाठी प्रत्येक गावांमधील सरपंच, इतर सदस्य व ग्रामसेवक यांनी उपाय योजनाबाबतचे प्रस्ताव त्वरित मंजुरीसाठी पाठवावेत व सदरच्या प्रस्तावांना संबंधीत अधिकाऱ्यांनी तात्काळ मान्यता देण्याचे आदेश पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी दिले.  ते आज भडगांव येथे  आयोजित तालुका टंचाई आढावा बैठकीत बोलत होते.
      यावेळी आमदार दिलीप वाघ, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, पंचायत समिती सभापती श्रीमती लक्ष्मीबाई पाटील, नगराध्यक्षा सौ. शुभांगी भोसले, तहसीलदार श्री. कापसे, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता श्री. ठाकूर आदि व्यासपीठावर उपस्थित होते तर भडगांव व तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य बैठकीस उपस्थित होते.
     सद्यस्थितीत पाणी टंचाईबाबत मंजुर असलेल्या उपाय योजनांची कामे गावांमधील पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी लक्ष घालून पूर्ण करुन घ्यावीत.  त्याकरिता संबंधीतांकडे पाठपुरावा करण्याची सूचना ना. देवकर यांनी केली.  तसेच टंचाईवर मात करण्यासाठी चालू वर्षीच्या कामांबरोबरच पुढील काळात टंचाईची परिस्थिती येऊ नये म्हणून महात्मा ज्योतीबा फुले जलसंधारण अभियानातून साठवण तलाव व बंधाऱ्यामधील गाळ काढणे, दुरुस्ती करणे आदि कामे ही हाती घेण्याची सूचना त्यांनी केली.
     ना. देवकर पुढे म्हणाले मार्च-एप्रिल नंतर टंचाईसदृश्य गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती घेऊन संबंधीत गावांना तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी भेटी द्याव्यात.   तसेच भडगांव  तालुक्यातील टचाईच्या गावांचा संबंधीत बीडीओ व तहसिलदार यांनी आठ दिवसांनी आढावा घेण्याची सूचना त्यांनी केली.
      टंचाई निवारण्याच्या कामात ग्रामसेवक महत्वाचा असून त्यांनी अ-प्रपत्र तात्काळ भरुन पाठवावेत.  व भूजल यंत्रणेने त्यांच्याकडे प्राप्त झालेले प्रस्ताव आठ दिवसात देण्याची सूचना जिल्हाधिकारी राजूरकर यांनी केली.  तसेच सावदा केटी वेअरची उंची वाढविणे व भडगांव नगरपालिकेने नदी पात्रात बांधलेल्या बंधाऱ्याची चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले तर मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले यांनी ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईन दुरुस्ती, पाईपलाईन नवीन टाकणे आदि कामे करुन पाणी पुरवठा केला जाईल असे सांगितले.
       यावेळी आमदार दिलीप वाघ, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक व नगर सेवक आदि पदाधिकाऱ्यांनी टंचाईबाबतच्या अनेक समस्या व सूचना ना. देवकर यांच्या समोर मांडल्या.  यामध्ये विहीर खोलीकरण, विंधन विहीर, पाईपलाईन दुरुस्ती, टॅकरने पाणी पुरवठा, सावदा केटी वेअरची उंची वाढविणे, वीज वितरण कंपनीच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांबाबत तक्रारी आदि .

पाचोरा तालुका टंचाई आढावा बैठक

     ना. देवकर यांनी आज दुपारी 3 वाजता पाचोरा येथील मालपुरे हॉल येथे पाचोरा तालुक्यातील टंचाईची परिस्थिती व त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी आमदार दिलीप वाघ, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, सीईओ शीतल उगले आदिसह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सरपंच, गा्रमसेवक व पाचोरा नगरपालिका नगराध्यक्ष व  नगरसेवक उपस्थित होते.
     प्रारंभी ना.देवकर यांनी पाचोरा तालुक्याचा गावनिहाय आढावा घेऊन टंचाईच्या उपाययोजना राबवितांना पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवण्याचे आवाहन केले.

No comments:

Post a Comment