Thursday, 3 January 2013

आम आदमी विमा योजना शिष्यवृत्ती लाभार्थ्यांच्या शोधासाठी मोहिम - हसन मुश्रीफ

मुंबई, दि. 3 : राज्यातील भुमिहिन शेतमजुर आणि अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी तसेच त्यांच्या 9 वी ते 12 वी पर्यंत शिकणाऱ्या मुलांसाठी राबविल्या जात असलेल्या आम आदमी विमा योजनेत पात्र लाभार्थ्यांची अद्याप पुरेशी नोंदणी झालेली नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या नोंदणीसाठी आता शोध मोहिम पंधरवडा राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2013 या कालावधीत राज्यभर ही मोहिम राबविली जाईल, अशी माहिती राज्याचे विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
श्री. मुश्रीफ यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज याबाबत बैठक झाली. बैठकीस विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री डी. पी. सावंत, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव आर. डी. शिंदे, उपसचिव ग. की. वाघ यांच्यासह राज्यातील विविध विभागांचे शिक्षण संचालक, उपसंचालक, उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.
आम आदमी विमा योजना ही केंद्र राज्य शासन यांच्या संयुक्त माध्यमातून राबविली जाते. केंद्र शासनाच्या निकषानुसार ग्रामिण भागातील भुमिहिन शेतमजूर या योजनेचा पात्र लाभार्थी आहे. या निकषामध्ये राज्य शासनाने काही बदल करुन 2.5 एकर बागायत किंवा 5 पाच एकर कोरडवाहू क्षेत्र असलेला शेतकरी सुध्दा या योजनेचा पात्र लाभार्थी राहील अशी सुधारणा केली आहे. ही योजना भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत राबविण्यात येते.
            या योजनेचे वार्षिक प्रतिलाभार्थी 200 रुपये विमा हप्त्यापैकी 100 रुपये केंद्र शासन तर 100 रुपये राज्य शासन भरते. त्यामुळे लाभार्थ्यास या योजनेचा मोफत लाभ मिळतो. लाभार्थ्यास अपघाती मृत्यू आल्यास 75 हजार रुपये, नैसर्गिक मृत्यू आल्यास 30 हजार रुपये प्रमाणे लाभार्थ्याच्या कुटूंबीयांस विमा संरक्षण देय आहे.  एक हात किंवा पाय यांना कायमचे अपंगत्व आल्यास 37 हजार 500 रुपये व दोन्ही हाताचे किंवा पायांना कायमचे अपंगत्व आल्यास 75 हजार रुपये लाभार्थ्यास विमा भरपाई देय आहे. याशिवाय या लाभार्थ्याच्या इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दोन अपत्यांना आम आदमी विमा योजना शिष्यवृत्ती शंभर रुपये दरमाह याप्रमाणे देय आहे. पात्र विद्यार्थी अन्य शिष्यवृत्ती घेत असला तरीसुध्दा ही शिष्यवृत्ती घेण्यास तो पात्र आहे. 
            आतापर्यंत 33 लक्ष लाभार्थ्यांची या योजनेत नोंदणी करण्यात आलेली आहे. यामध्ये फक्त 7 हजार लाभार्थ्यांच्या कुटूंबीयांना लाभ देण्यात आला आहे.  तरीसुध्दा अजूनही अनेक लाभार्थी या योजनेपासून निव्वळ योजनेची माहिती नसल्याने वंचित राहिले असण्याची शक्यता आहे.  म्हणून या योजेनपासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये याकरिता त्या लाभार्थ्याकडून अर्ज भरुन घेवून तो मंजूर करुन घेणे यासाठी राज्यात सर्व स्तरावर जागृती आवश्यक आहे. तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोल पाटील, अंगणवाडी शिक्षीका, आशा वर्कर्स, शिक्षक इत्यादी सर्वच अधिकारी, पदाधिकारी यांनी गावांगावात लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे श्री. मुश्रीफ म्हणाले.    
            राज्यात इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेणारे अंदाजे 6 ते 7 लाख विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. प्रत्यक्षात या वर्षी फक्त 26 हजार  विद्यार्थ्यांना अशा शिष्यवृत्तीचा लाभ मिळत आहे. म्हणजेच फार मोठया प्रमाणात गरीब गरजू विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित रहात आहेत. त्यांचा शोध घेण्याकरीता उपसंचालक (शालेय शिक्षण), शिक्षण अधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), उप/गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, वर्गशिक्षक यासह अधिकारी पदाधिकाऱ्यांनी 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी, 2013 या कालावधीत आम आदमी विमा योजना शिष्यवृत्ती लाभार्थी शोध मोहिम पंधरवडा  राबवावा, असे आवाहन श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.

1 comment: