चाळीसगांव दि.1 :- राज्यातील
123 तालुके टंचाईग्रस्त म्हणून जाहीर झालेले असून त्यात जळगांव जिल्हयातील 12 तालुक्यांचा
समावेश आहे. या तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये
उपाय योजना राबविण्यासाठी शासनाकडून मोठया प्रमाणात निधीची उपलब्धता झाली असून सदरच्या गावांना टंचाईच्या झळा बसू दिल्या जाणार
नसल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना.गुलाबराव देवकर यांनी केले. ते आज चाळीसगांव तालुका
पाणी टंचाई आढावा बैठकीत पदाधिकारी/अधिकारी यांना मार्गदर्शन करत होते.
यावेळी आमदार राजीव देशमुख, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर,
मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, पंचायत समिती सभापती विजय जाधव, नगराध्यक्षा अनिता
चौधरी, शशिकांत साळुंखे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती राजेंद्र राठोड, उप विभागीय
अधिकारी गणेश मिसाळ, तहसिलदार शशिकांत हदगल, गट विकास अधिकारी मालती जाधव, नायब तहसिलदार
महेंद्र माळी आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
ना. देवकर पुढे म्हणाले
जिल्यातील 15 तालुक्यांपैकी 12 तालुके टंचाईग्रस्त म्हणून जाहीर झाले असून सदरच्या तालुक्यातील पाणी टंचाईबाबतच्या
उपाययोजनेचा आढावा व सरपंच आदी पदाधिका-यांच्या त्याबाबतच्या समस्या जाणून घेणे व त्यातून
मार्ग काढणे याकरीता तालुकास्तरावर बैठका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील सर्व सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, जि.प. तसेच प.स.
सदस्य आदी पदाधिका-यांनी समन्वय साधून गावामधील पाणीटंचाई संबंधीचे प्रस्ताव त्वरीत
सादर करावेत. तसेच सदर प्रस्तावांचा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याच्या सुचना ना. देवकर
यांनी यावेळी केल्या. बहुतांश गावांमध्ये मार्च
ते एप्रिल नंतर टंचाई भासणार नाही याकरीता तहसिलदार व गट विकास अधिकारी यांनी उपाययोजना
राबविण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या. आज आयोजित करण्यात आलेल्या टंचाईच्या
आढावा बैठकीत अनुपस्थीत असलेल्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कार्यवाही करण्याच्या
सुचना देऊन टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेतील अकार्यक्षम
अधिकारी/कर्मचा-यांवर कडक कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी
यावेळी दिल्यात.
जिल्हाधिकारी राजूरकर
यांनी टंचाईवर मात करण्यासाठी लोकांनी शासकीय उपाय योजनांबरोबरच लोकसहभागातून विहीरीतील
गाळ काढणे, विहीरीची खोली वाढविणे आदी कामे करण्याचे आवाहन केले. तसेच ज्या गावांत
सद्य:स्थितीत पाणी साठा उपलब्ध आहे. त्या गावातील लोकांनी पाण्याचा काटकसरीने वापर
करुन पाणीसाठा जुनअखेर पुरेल असे नियोजन करावे असे त्यांनी सांगितले.
आमदार राजीव देशमुख म्हणाले की, तालुक्यातील सर्व पदाधिकारी,
ग्रामसेवक यांनी प्रशासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवावेत. त्यामुळे सदरच्या गावांमधील
टंचाईवर त्वरीत उपाययोजना केल्या जातील. तसेच पदाधिकारी, ग्रामस्थ व प्रशासनाने योग्य
नियोजन केल्यास तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करणे शक्य होईल असे त्यांनी सांगितले.
तसेच भु-जल सर्वेक्षण कार्यालयाकडे पुरसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने सर्वेक्षणाच्या
कामात दिरंगाई होत असून सदर विभागाला पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करुन देण्याची मागणी
त्यांनी यावेळी केली. विज वितरण अधिका-यांनी गावांमधील कोणत्याही पाणीपुरवठा योजनांचे
विज कनेक्शन खंडीत करु नये करीता पालकमंत्र्यांनी संबंधीतांना सुचना देण्याची मागणी
केली.
प्रारंभी तहसिलदार शशिकांत हदगल यांनी प्रास्ताविक केले. त्यात
चाळीसगांव तालुक्यात 35 बोअरवेल मंजूर झाले असून त्यापैकी 11 बोअरवेल पुर्णत्वास
आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर ना. देवकर यांनी चाळीसगांव तालुक्यातील टंचाईग्रस्त
गावांचा गावनिहाय आढावा घेतला. यामध्ये बहुतांश पदाधिका-यांनी बोअरवेल, विहीर खोदणे,
पाण्याचे आवर्तन सोडणे, विहीरीत आडवे बोअरवेल
घेणे, टँकरने पाणी पुरवठा करणे, वीज कनेक्शन खंडित करु नये आदी समस्या मांडून
त्यावर त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली. या बैठकीस तालुक्यातील सर्व
कार्यालय प्रमुख, सरपंच, ग्रामसेवक आदि
मोठया संख्येने उपस्थित होते. तर गटविकास अधिकारी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
* * * * * * *
No comments:
Post a Comment