Friday, 4 January 2013

धरणगांव तालुक्यातील पदाधिकारी व प्रशासनाने परस्परांत समन्वय ठेवून काम करावे : जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर

             जळगांव, दि. 4 : धरणगांव तालुक्यातील पदाधिकारी व प्रशासन यांच्यामध्ये समन्वयाचा आभाव असल्याचे टंचाईच्या उपाययोजना राबवत असताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना पाण्याची टंचाई भासणार नाही याकरिता सर्व पदाधिकारी व प्रशासनाने परस्परांत समन्वय ठेवून काम करण्याची सूचना जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केली.
         पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली धरणगांव येथे तालुका टंचाई आढावा बैठकीत जिल्हाधिकारी राजूरकर उपस्थित पदाधिकारी व प्रशासकीय अधिका-यांना मार्गदर्शन करत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, पंचायत समिती सभापती राजूभैय्या पाटील, नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई महाजन, प्रांताधिकारी रविंद्र राजपूत, तहसिलदार महेंद्र शेलार, बीडीओ ए.जी.तडवी , पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. ठाकूर आदि उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी राजूरकर पुढे म्हणाले धरणगांव नगरपालिका हद्दीतील सर्व नळांना तोटया बसविण्याची कार्यवाही करावी. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही व गरजू लोकांपर्यत पाणी मिळेल तसेच ग्रामपंचायत / ग्रामसेवक यांनी पाणी पुरवठयाची तात्पुरती उपाय योजना प्रस्तावीत करत असताना ती कमी खर्चीक असावी हे पाहावे. त्यामुळे सदरच्या योजनेला तात्काळ मंजुरी देऊन गावाचा पाणी पुरवठा करणे सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले.
         प्रारंभी पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी धरणगांव तालुक्यातील पाणी टंचाईचा गावनिहाय आढावा घेतला त्या अंतर्गत त्यांनी गावांमधील पदाधिकारी, ग्रामसेवक व ग्रामस्थांच्या समस्या व सूचना ऐकून घेतल्या व सदरच्या सूचना व समस्यांबाबत प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश ना. देवकर यांनी दिले. तसेच टंचाई निवारण्याच्या कामात तहसिलदार, बीडीओ, व पाणी पुरवठा अभियंता यांनी समन्वय ठेवून काम करावे असे त्यांनी सांगितले.
        जिल्हयातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील गावांमध्ये टंचाईचा उपाय योजना राबवित असताना महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व  महात्मा फुले जल भूमी अभियानातून लहान तलाव बांधणे, जुन्या तलावातील गाळ काढणे व तलावाची दुरुस्ती करणे आदि कामे घेण्याची सूचना ना. देवकर यांनी केली. सदरच्या कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिल्याची माहिती त्यांनी दिली. 
         तसेच जांभोरा गावामधील पाणी प्रश्न संवेदनशील बनला असून पूर्वीच्या पाणी पुरवठा समिती कडून योजनेचे काम काढून घेऊन ते काम व दप्तर आजच नवीन समितीकडे देण्याचे आदेश पाणी पुरवठा विभागाच्या अधिका-यांना ना. देवकर यांनी दिले जर पूर्वीच्या समितीने दप्तर देण्यास टाळाटाळ केल्यास समितीवर गुन्हे दाखल करावेत, असे ही त्यांनी सांगितले तसेच झुरखेडा, शेरी, आव्हाणी, खर्दे, मुसळी आदि गावांसाठी गिरणा नदीवरुन कायमस्वरुपी पाणी पुरवठा योजना राबविण्याची सूचना ना. देवकर यांनी केली. तसेच सर्व गावांमधील पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी  मार्च – एप्रिल नंतर पाणी टंचाई भासू नये म्हणून उपाय योजनांचे प्रस्ताव प्रशासनाकडे त्वरित देऊन सदरच्या कामाचा पाठपुरावा तहसिलदार व बीडीओकडे करण्याचे त्यांनी सांगितले तसेच वीज वितरण कंपनीच्या अधिका-याशी टंचाईच्या परिस्थितीची जाणीव ठेवून गावाच्या भारनियमनाच्या वेळेत बदल  करण्याचे त्यांनी सूचित केले.
           मुख्यकार्यकारी अधिकारी शीतल उगले यांनी पाणी पुरवठा समित्यांनी दिलेल्या कालावधीत योजनेचे काम पूर्ण करावे. जर काम पूर्ण झाले नाही तर अशा समित्यावर एफ आय आर दाखल केली जाईल असे सांगितले. तसेच पाणी उपलब्ध असलेल्या गावांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची सूचना त्यांनी केली. तहसिलदार महेंद्र पवार यांनी 12 विहीरीचे खोलीकरण करणे, 28 खाजगी विहीर अधिग्रहण, 65 नवीन विंधन विहीर घेणे, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना 2 आदि सह एकूण 107 उपाय योजना करिता 56 लाख 33 हजार रु. प्रस्तावीत केल्याची माहिती यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रस्तावीक तहसिलदार पवार यांनी केले तर आभार गट विकास अधिकारी ए.जी.तडवी यांनी मानले. सदरच्या तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, जिल्हापरिषद सदस्य , नगरसेवक, तलाठी व ग्रासेवक मोठया संख्येने उपस्थित होते.
*  *  *  *  *  *

No comments:

Post a Comment