जळगांव, दि. 11 :- जिल्हयात पाणी टंचाईची
परिस्थिती गंभीर असल्याने ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे टंचाईच्या उपाय योजना
संबंधी आलेल्या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी असतील तर असे प्रस्ताव परत न पाठविता
संबंधीत तहसिलदार व गट विकास अधिकारी यांचेशी तात्काळ संपर्क साधून सदरच्या त्रुटी
दूर करुन मंजुरी देण्याचे आदेश पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी दिले.
भुसावळ तालुका पाणी टंचाई आढावा बैठकीत ना. देवकर बोलत होते. यावेळी आमदार
संजय सावकारे, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल
उगले, भुसावळ पंचायत समिती सभापती सौ. मंगला झोपे, नगराध्यक्ष उमेश नेमाडे,
प्रांताधिकारी राहुल मुंडके, जिल्हा सहकारी बँकेचे सदस्य वाल्मीक पाटील, तहसिलदार
श्रीमती वैशाली हिंगे, गट विकास अधिकारी श्री. तायडे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी
अभियंता पुरुषोत्तम ठाकूर, वरिष्ठ भू – वैज्ञानिक श्री. वाघमारे आदि उपस्थित होते.
ना. देवकर पुढे म्हणाले, कोणत्याही गावांमधील पाणी टंचाई निवारण्यासाठी
विहीर अधिग्रहीत करत असतांना तहसिलदार व
गट विकास अधिकारी यांनी स्वत: पाहणी करुन प्रशासकीय दृष्टया योग्य असलेल्या
विहीरीचे अधिग्रहण करावे तसेच बोअरवेल करत असतांना 200 फुटा पर्यंत शासन मदत करेल त्यापेक्षा
अधिकचे काम ग्रामपंचायतीने ग्रामनिधी मधून करण्याची सूचना ना. देवकर यांनी केली.
तसेच ज्या ठिकाणी सामुहिक पाणी पुरवठा योजनांमधून
लिकेज होत आहे तेथे दुरुस्ती करुन घ्यावी व अशा ठिकाणाहून जे शेतकरी पाण्याची चोरी
करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची सूचना ना. देवकर यांनी पाणी पुरवठा विभागाला
केली. तर वरणगावला पाणी पुरवठा करणा-या नवीन योजनेचे काम संबंधीत ठेकेदार संथ
गतीने करत असल्याने त्यावर दंडाची कारवाई करावी अथवा त्यांच्याकडून काम काढून
घेण्याचे त्यांनी सांगितले.
आमदार संजय सावकारे यांनी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमधील समस्या सांगून
उपाय योजना करण्याची मागणी केली. तसेच तालुक्यातील काही गावांमधील पूर्वीची
स्वतंत्र पाणी पुरवठा योजना बंद करुन त्या गावांवर जबरदस्तीने भारत निर्माण योजना
लादल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ही गांवे टंचाईला सामोरी जात असून अशा
गावांना स्वतंत्र पाणी पुरवठा योजना त्वरित मंजूर करण्याची मागणी आमदार सावकारे
यांनी केली. तसेच टंचाईग्रस्त गावांना टँकर सुरु करण्याचे अधिकार प्रांताकडे
देण्याची मागणी त्यांनी केली.
जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी भुसावळ नगर पालिकेचे बॅके मधील सर्व
खाते बंद केलेले आहेत. त्यामुळे शहराला
पाणी पुरवठा दिनांक 16 जानेवारीच्या
सुनावणी पर्यत सुरु राहावा यासाठी वीज
वितरण कंपनीने योजनेचे वीज कनेक्शन खंडित करु नये. तसेच स्ट्रीट लाईटही सुरु
ठेवण्याची सूचना वीज वितरण कंपनीच्या अधिका-यांना दिल्या.
तहसिलदार वैशाली हिंगे यांनी प्रास्तावीकात तालुक्यातील 36 गावांसाठी 64
उपाय योजना राबविण्यात येत असून तालुक्यातील सर्व गावांची आणेवारी 50 पैसे पेक्षा
कमी असल्याचे सांगितले.
यावेळी भुसावळचे नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा परिषद व पंचायत समिती
सदस्य यांचेसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदिंनी सदरच्या बैठकीत
उपस्थित राहून टंचाई विषयी समस्या मांडल्या.
साहित्य वाटप
भुसावळ पंचायत समिती मार्फत रमाई आंबेडकर योजनेतून लाभार्थ्यांना सौर
कंदील व ब्लॅकेटसचे वाटप पालकमंत्री ना. देवकर , आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी
राजूरकर आदि मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. लाभार्थीमध्ये श्री. बाजीराव
तायडे, सुखदेव प्रल्हाद सुरवडे, लिलाधर गुलाब तायडे, पल्लवी देवचंद कोळी, संजय कौतिक
सुरवाडी आदिंचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment