Monday, 7 January 2013

स्पर्धेच्या माध्यमांतून दर्जेदार कलापथकांची निवड करणार -- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार



           जळगांव, दि. 7 :- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान 2012 – 13 अंतर्गत जळगांव जिल्हयातील नागरिकांमध्ये कला पथकाव्दारे आरोग्य विषयक योजनांची जनजागृती व्हावी म्हणून कला पथकांव्दारे कार्यक्रमाचे सादरीकरण समिती समोर करण्यात आलेले आहे. त्यामुळे कला पथकामध्ये सादरीकरणाबाबत स्पर्धा होऊन त्यातून दर्जेदार कला पथकांची निवड जनजागृती कार्यक्रमासाठी केली जाईल, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.
          जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात आज सकाळी 10 ते 6 या कालावधीत जळगांव, अमरावती, वर्धा, बीड, जालना, बुलढाणा आदि जिल्हयातून आलेले सुमारे 22 कला पथकांनी लोक कला पथक संघ निवड समिती समोर आरोग्य कार्यक्रमांचे सादरीकरण केल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली.
         राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान 2012-13 अंतर्गत जळगांव जिल्हयात जननी सुरक्षा योजना,  जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, दवाखान्यातील प्रसुती, स्त्री भृणहत्या, प्रसुतीपूर्व गर्भलिंग निदान, कुपोषण व पुरुष नसबंदी आदि विषयांवर निवड करण्यात आलेल्या कला पथकांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जाणार असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले.
       आज जवळपास 22 कलापथकांनी वरील योजनांवरील दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण केलेले असून यापैकी काही कला पथकांची गुणवत्ता व सादरीकरणाचा दर्जा पाहून त्यांना सुमारे 200 ते 300 गावांमध्ये वरील योजना विषयी जनजागृती करण्याची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे ही डॉ. पवार यांनी सांगितले.
       सदरच्या लोक कला पथक संघ निवड समितीची प्रथमच स्थापना करुन स्पर्धेच्या  व गुणवत्तेच्या आधारावर कला  पथकांची निवड करणार असल्याचे सांगून सदरच्या समितीत जिल्हा आरोग्य अधिकारी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी व एक सांस्कृतिक शिक्षक आदि सदस्य असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली असून सदरच्या स्पर्धेचा दोन – तीन दिवसात निकाल जाहीर करुन संबंधीत पथकांना कळविण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment