Tuesday, 29 January 2013

टंचाईअंतर्गत पाणी पुरवठ्याकरिता 413. 98 कोटी रुपयांचा निधी वितरित - डॉ. पतंगराव कदम



            मुंबई, दि. 29 : राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर टंचाई निवारणासाठी उपलब्ध झालेल्या निधी पैकी पाणीपुरवठा विभागास एकूण 413. 98 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असल्याची माहिती वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
            वनमंत्री पुढे म्हणाले,  पुणे विभागीय आयुक्त आणि मराठवाडा विभागाचे आयुक्त यांना आजच्या आढावा बैठकीत बोलावून दोन विभागातील पिण्याचे पाणी, रोजगार हमी योजनेची कामे, चारा छावण्या इत्यादी बाबत टंचाईग्रस्त परिस्थितीची माहिती घेण्यात आली. टँकर्सचे फिडींग पॉईंट आणि डिजिटल रोड मॅपिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. फेब्रुवारी अखेर पाण्याची पातळी जास्त खाली गेल्यास अन्य 128 पाँईट शोधण्यात आले आहेत. टँकर्स मधील पाणी विहिरीत न ओतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. टँकर्स मधील पाणी सिंटेक्स टाक्यांमध्ये ओतण्यासाठी सहकारी संस्थांकडून या टाक्या उपलब्ध करुन घेण्यात येणार आहेत. काही नळपाणी पुरवठा योजनांच्या तात्पुरत्या दुरुस्तीची कामे त्वरित हाती घेण्यात येणार आहेत. पिण्याचे पाणी पिण्यास योग्य आहे  का याचीही पाहणी करण्यात येणार आहे.
केंद्राच्या 778 कोटी रुपये निधीचे वितरण
            केंद्र शासनाकडून टंचाई निवारणासाठी 778 कोटी रु. निधी प्राप्त झाला असून शेतपिकांच्या नुकसानीसाठी 563.29 कोटी फळबागांसाठी 91.29 कोटी चारा छावण्यासाठी 78.88 कोटी पाणी पुरवठयासाठी 50.63 कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. कापूस,सोयाबीन धान यांच्या 2 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये 1891.2 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले असून 93.8 कोटी रुपये जिल्हाधिकारी यांच्याकडे शिल्लक आहेत, असे डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले.
चारा वितरणासाठी 684.29 कोटी रुपये वितरित
            राज्यात 1205 गावे व 3789 वाड्यांसाठी एकूण 1613 टँकर्स चालू आहेत. राज्यात एकूण 420 चारा छावण्या आहेत त्यामध्ये 3.26 लाख मोठी व 42,959 लहान जनावरे आहेत. जनावरांची एकूण संख्या 3.82 लाख आहे. छावण्यांवर 256.08 कोटी रुपये खर्च झाले असून चारा वितरणासाठी एकूण वितरित निधी 684.29 कोटी रुपये इतका आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नरेगा अंतर्गत 16,286 कामे चालू
            महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत एकूण चालू कामे 16,286 असून मजुरांची उपस्थिती 1.34 लाख आहे. शेल्फवरील कामे 4.48 लाख असून मजूर क्षमता 29.76 कोटी आहे.
वनात तळ्यांची निर्मिती करणार
            डॉ. कदम पुढे म्हणाले, पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे मोठया प्रमाणात जनावरे खाली उतरली आहेत. ही बाब लक्षात घेऊन सिमेंटच्या टाक्यांमध्ये टॅंकर्सद्वारे  पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यापुढे भविष्यकाळात तळयांची निर्मिती करण्याचा कार्यक्रम मोठया प्रमाणात हाती घेण्यात येणार आहे. सहकारी संस्थांनी चारा छावण्या उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा याकरिता छावण्यासांठी असलेल्या डिपॉझिटची रक्कम पाच लाखांवरुन दोन लाख इतकी करण्याची शिफारस उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment