Thursday, 24 January 2013

मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करावे --जिल्हाधिकारी



           जळगांव, दि 24 :- प्रत्येक निवडणूकीत मतदारांनी निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनास बळी  न पडता मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यचे आवाहन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले.
           जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात आयोजित राष्ट्रीय मतदार दिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित मतदारांना जिल्हाधिकारी राजूरकर यांनी प्रतिज्ञा दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, उपजिल्हाधिकारी सर्वश्री साजीद पठाण, के.सी.राजगुरु, जितेंद्र वाघ, डॉ. संतोष थिटे, कैलास देवरे आदि उपस्थित होते.
       प्रारंभी जिल्हा उपनिवडणूक अधिकारी डॉ. संतोष थिटे यांनी जिल्हाधिकारी राजूरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर दिशा बहुउद्देशीय संस्थेच्या कलाकारांनी मतदार जागृती विषयी पथनाटय सादर केले. सदरच्या नाटयांतून मतदारांकडून मतदान करण्यासाठी घेण्यात येणारा आर्थिक मोबदला, बुध्दीवंत व मध्यमवर्गातील मतदारांचे मतदानाविषयी असलेली अनास्था, बेरोजगार मतदारांनी मत विकणे आदिवर नाटयमय प्रहार करण्यात आला. व लोकशाहीवर विश्वास ठेवून शांततामय वातावरणात कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याचे या पथनाटयातून  करण्यात आले.
            जळगांव जिल्हयात 15 जानेवारी 2013 अखेर एकूण 30 लाख 84 हजार 428 मतदार असून 16 लाख 26 हजार 539 पुरुष तर 14 लाख 57 हजार 889 महिला मतदार आहेत. तसेच मतदार यादी पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गत     1 लाख 47 हजार 615 नव मतदारांची नोंद झाल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. थिटे यांनी दिली. या नवमतदारामध्ये पुरुष  मतदार 83 हजार 394 तर महिला मतदार 64 हजार 22 असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी मतदारांसाठी असलेल्या प्रतिज्ञाचे वाचन करुन उपस्थितांना प्रतिज्ञा दिली.  
           त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्हयातील नवमतदारांना प्रातिनिधीक स्वरुपात ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. यात नरेंद्र कडू खडके , किरण श्रीकृष्ण काळे, उमेश बनकर, हेमलता रामचंद्र बनूकर, नर्गिस शेख, हेमलता शामकांत राणे आदि नवमतदारांचा समावेश होता.
           सदरचा राष्ट्रीय मतदार दिवस भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दि. 25 जानेवारी रोजी देशभरात सर्वत्र साजरा करुन मतदारांमध्ये जनजागृती केली जाते. परंतु दि. 25 जानेवारी रोजी शासकीय सुट्टी असल्याने सदरच्या कार्यक्रम आज घेण्यात आला.व बीएलओ चे मानधन प्राप्त झालेले असून ते लवकरच त्यांच्या बॅक खात्यात जमा केले जाणार असल्याचे थिटे यांनी सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसिलदार कैलास देवरे यांनी केले तर डॉ. संतोष थिटे यांनी आभार मानले.  

No comments:

Post a Comment