Friday, 14 September 2012

ग्राहकांनी खरेदी व्यवहारात जागरुक रहावे - अनिल देशमुख



मुंबई, दि. 14 : भारतीय संस्कृतीमध्ये सणासुदीस खास महत्त्व आहे.  आगामी काळात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी व ख्रिसमस इत्यादी सणासुदीचे दिवस सुरु होत आहेत.  या दिवसात विशेषत: मिठाई, ड्रायफ्रूटस्, सजावटीच्या शोभेच्या वस्तू, फटाके आदी वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात.  याचा गैरफायदा काही अप्रामाणिक दुकानदार घेतात.  त्यामुळे ग्राहकांनी खरेदी व्यवहारात जागरुक राहून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
            ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना त्या दिलेल्या मोबदल्यानुसार वजनात, मापात व संख्येत योग्य तऱ्हेने मिळतील याची खात्री करावी.
            वजन काटा व स्वयंदर्शी काट्याचे इलेक्ट्रॉनिक्स इंडिकेटर याद्वारे केलेले वजन अचूक असल्याची खात्री करावी. इलेक्ट्रॉनिक्स स्केलच्या इंडिकेटरवर 00 (शून्य) असल्या खेरीज त्यावर वजन केले जाणार नाही याकडे लक्ष द्यावे.  मिठाई, ड्रायफ्रुट्स, मावा, खवा इत्यादी खरेदी करतेवेळी त्यांचे वजन खोक्याशिवाय करणे दुकानदारास बंधनकारक आहे त्याकडे ही ग्राहकांनी लक्ष द्यावे.
            पॅकबंद मिठाई, ड्रायफ्रूटस्, भेटवस्तू व सजावटीच्या वस्तू इत्यादींच्या आवेष्टनावर वस्तूचे नाव, उत्पादकाचे आवेष्टकाचे / आयातदाराचे नाव व संपूर्ण पत्ता, आवेष्टीत वस्तूचे निव्वळ वजन / माप / संख्या, विक्रीची किरकोळ किंमत, उत्पादनाचा महिना वर्ष तसेच त्याचे ग्राहक हेल्पलाईन नंबर इत्यादी बाबी घोषित करणे आवश्यक आहे. त्या बाबींचा उल्लेख केला आहे की नाही हे ग्राहकांनी तपासून घ्यावे. तसेच ग्राहकांनी वस्तुसाठी छापील किंमतीपेक्षा जास्त किंमत देवून वस्तू खरेदी करु नये. वस्तुवरील छापील किंमतीमध्ये खाडाखोड आढळल्यास अशी आवेष्टित वस्तू खरेदी करु नये व यासंदर्भात काही गैरप्रकार आढळून आल्यास नियंत्रक, वैधमापन शास्त्र, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांक 022-22886666 यावर अथवा dclmms complaints @yahoo.com या ई-मेलवर किंवा वैधमापनशास्त्र विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन  करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment