मुंबई, दि. 25 : राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेला असल्याने आगामी काळात चारा
टंचाई निर्माण होण्याची शक्यता विचारात घेऊन चारा उत्पादनाला गती देण्यासाठी
राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत सन 2012-13 मध्ये गतिमान वैरण विकास
कार्यक्रम राबविण्यासाठी 2977 लाख रुपयांच्या (एकोणतीस कोटी 77 लाख रुपये) निधीला शासनाने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे.
राज्यातील वैरण
उत्पादनातील कमतरता काही प्रमाणात भरुन
काढण्यासाठी तसेच पशुपालकांकडे असलेल्या पशुधनाची उत्पादकता वाढविणे व त्या
अनुषंगाने जास्तीत जास्त दुग्धोत्पादनासाठी पशुधनाला पुरेशी हिरवी वैरण उपलब्ध
होण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतावर वैरणीचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन
देण्याकरिता केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत गतिमान वैरण विकास योजना मंजूर केली आहे. ही योजना
राज्यातील सर्व 33 जिल्ह्यांमध्ये आहे. सदरचा कार्यक्रम समुह स्वरुपात राबविण्यात येणार असून, प्रत्येक
समुह हा किमान 500 हेक्टर क्षेत्राचा असणार आहे. या समुहामध्ये चारा पीक उत्पादन
प्रात्यक्षिके या बाबीचा प्रामुख्याने समावेश आहे.
राज्यामध्ये सरासरीपेक्षा
कमी पाऊस झालेला असल्याने आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता विचारात
घेऊन चारा उत्पादनाला गती देण्यासाठी सन 2012-13 मध्ये केंद्र शासनाने सदर
कार्यक्रम राबविण्याकरिता अतिरिक्त रुपये 2000 लाख (वीस कोटी रुपये) इतके अर्थसहाय्य
वितरीत केलेले आहे. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमांतर्गत सन 2011-12 या आर्थिक
वर्षाची 200 लाख रुपये शिल्लक रक्कम व केंद्र शासनाने वितरीत केलेली रु. 777 लाख अशी एकूण रु. 2977 लाख इतक्या
रकमेस प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
No comments:
Post a Comment