Tuesday, 25 September 2012

4,637 ग्रामपंचायतींसाठी 21 ऑक्टोबरला मतदान

मुंबई, दि. 25 : राज्यातील 4 हजार 637 ग्रामपंचायतींसाठी 21 ऑक्टोबर 2012 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केली असून या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडणूक होत असलेल्या या सर्व ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर 2012 मध्ये संपत आहे. या निवडणुकांसाठी 30 जून 2012 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल. 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2012 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जाणार नाहीत. 6 ऑक्टोबर 2012 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. 8 ऑक्टोबर 2012 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याच दिवशी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होईल व अंतरिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. 21 ऑक्टोबर 2012 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 22 ऑक्टोबर 2012 रोजी होईल. त्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
या सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे (EVM) मतदान घेण्यात येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा दैनंदिन हिशोब सादर करणे आवश्यक राहील; तसेच निवडणुकीनंतर 30 दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल. ही माहिती सादर करणाऱ्या उमेदवारांना अनर्ह ठरविण्यात येते, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही राज्य निवडणूक आयुक्तांनी केले आहे.
विभाग व जिल्हानिहाय निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या अशी:
कोकण: ठाणे- 2, रायगड- 232, रत्नागिरी- 224, एकूण- 458.
नाशिक: नाशिक- 176, अहमदनगर- 136, धुळे- 83, जळगाव- 3, नंदुरबार- 53,  एकूण- 451.
पुणे: पुणे- 8, कोल्हापूर- 434, सांगली- 391, सातारा- 292, सोलापूर- 56, एकूण- 1181.
औरंगाबाद: औरंगाबाद- 217, बीड- 7, हिंगोली- 16, जालना- 136, लातूर- 351,  नांदेड- 115, उस्मानाबाद- 166, परभणी- 3, एकूण- 1011.
अमरावती: अमरावती- 108, बुलढाणा- 279, यवतमाळ- 93, एकूण-480.
नागपूर: नागपूर- 219, भंडारा- 381, चंद्रपूर- 57, गडचिरोली- 37, गोंदिया- 356, वर्धा- 6, एकूण- 1056. 
नगरपरिषदांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक
विविध नगरपरिषदांच्या 9 रिक्त जागांसाठीदेखील पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही राज्य निवडणूक आयुक्तांनी जाहीर केला आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे 1 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर 2012 या कालावधीत दिली व स्वीकारली जातील. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 13 ऑक्टोबर 2012 असेल. 21 ऑक्टोबर 2012 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होईल व त्याच दिवशी मतमोजणी होईल.
नगरपरिषदनिहाय मतदान होणाऱ्या जागांचा तपशील असा:
मुरुड-जंजिरा (जि. रायगड): प्रभाग क्र. 3-ब, अनुसूचित जमाती (महिला), प्रभाग. क्र. 4- ब, अनुसूचित जमाती; पेण (जि. रायगड): प्रभाग क्र. 1-अ, सर्वसाधारण (महिला); दुधनी (सोलापूर): प्रभाग क्र. 2-ब,  अनुसूचित जमाती (महिला); कळंब (उस्मानाबाद): प्रभाग क्र. 1-ब, सर्वसाधारण; अकोट (अकोला): प्रभाग क्र. 5-ड, सर्वसाधारण (महिला) ; बाळापूर (अकोला): प्रभाग क्र. 3-ब, सर्वसाधारण (महिला) ;वरूड (अमरावती): प्रभाग क्र. 3-ड, सर्वसाधारण ; सिंदी रेल्वे (वर्धा): प्रभाग क्र. 3-ब, नागरिकांचा मागासर्वग प्रवर्ग.

No comments:

Post a Comment