जळगांव, दिनांक 8:- तापी नदीला दि. 6 सप्टेंबर
रोजी आलेल्या पुरामुळे चोपडा तालुक्यातील नदी काठच्या 35 गावांमधील सुमारे दोन
हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. तरी
सदरच्या गावांमधील झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने तात्काळ सुरु करुन
नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळण्यासाठी त्यांच्या याद्या तयार करण्याचे
आदेश पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी दिली. ते पुरामुळे बाधित गावांचा दौरा
करतांना उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत होते.
पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज चोपडा
तालुक्यातील पुरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या पुनगांव, मितावली, पिंप्री,
दोंदवाडे आदि गावांचा पाहणी दौरा केला.
यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे
आश्वासन दिले.तसेच तसेच सदरच्या गावांमधील शेतीमध्ये पाणी असल्याने पंचनामे सुरु
होऊ शकलेले नाहीत. ते पंचनामे आजपासून सुरु करण्याची सूचना ना. देवकर यांनी
प्रशासनाला केली. तसेच पंचनामे करतांना योग्य ती खबरदारी घ्यावी व शेती पिकांचे व
घरांचे नुकसान झालेल्या प्रत्येकाचे पंचनामे करावेत.
चोपडा तालुक्यतील 35 गावांमधील जवळपास दीड हजार
शेतकऱ्यांचे अंदाजे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील कापूस, केळी, ज्वारी, उडीद, मूंग
आदि पिकांचे पुरामुळे नुकसान झाल्याची माहिती चोपडा तहसिलदार एस.बी.गवळी यांनी
पालकमंत्र्यांना दिली. तसेच पुराचे पाणी ओसरले असल्याने आज पासून नुकसानीचे
पंचनामे करुन प्राथमिक अहवाल लवकरच तयार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.पुरामुळे
नुकसान झालेल्या पिकांमध्ये कापूस ( 625 हेक्टर ), केळी ( 265 हेक्टर ), मुंग (
224 हेक्टर ) , उडीद ( 149 हेक्टर ), ज्वारी ( 134 हेक्टर ) व इतर पिके ( 208
हेक्टर ) आदिंचा समावेश आहे.
जिल्हयात तापी, पूर्णा व अंजनी नदीला आलेल्या
पूरामुळे व बॅक वॉटरमुळे रावेर, मुक्तईनगर, चोपडा, धरणगांव आदि तालुक्यातील मोठया
क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले आहे.
त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून दिलासा
मिळावा याकरिता मागील तीन दिवसांपासून पाहणी दौरे केले जात आहेत. तसेच शासन ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी
तत्परच आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करुन त्याचा शासनाकडे अहवाल
पाठविल्यास शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन
ना. देवकर यांनी शेतकऱ्यांना दिले.
शेतकऱ्यांनी
सहकार्य करावे :-पुरामुळे
नुकसान झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांनी ही पंचनामे करण्यासाठी आलेल्या महसूल व
कृषि विभागांच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे व आपल्या गावातील एका ही
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नाव यादीतून सुटले जाणार नाही याची काळजी घ्यावी.
प्रशासनाचे
कौतुक :- पालकमंत्री ना. देवकर
यांनी पुरग्रस्त भागातील शेती पिकांचे व घरांचे पंचनामे विषयी तात्काळ सुरु केलेली
कार्यवाहीचे कौतुक केले. प्रशासनाकडून सदरच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई न
होता हे काम केले जात असल्याबददल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच पाहणी दौऱ्या
दरम्यान बहुतांश शेतकऱ्यांनी प्रशासनाने केलेल्या पंचनाम्याबददल समाधान व्यक्त
केल्याचे ना. देवकर यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या
समस्या व सूचना :- सदरच्या
गावांमधील शेतकऱ्यांनी ना. देवकर यांचेकडे पंचनामे पारदर्शकपणे करावेत, गावांमधील
वीजेचे रात्रीचे भारनियमन बंद करावे, गावांमधील रस्ते दुरुस्ती, नवीन पुलांची
मागणी व शेतकऱ्यांना पीक विमा योजनांची माहिती, नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ
मदत देण्याची मागणी अशा विविध समस्या व सूचना केल्या. सदरच्या सूचनांवर कार्यवाही
करण्याचे आश्वासन ना. देवकर यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात चोपडा मतदार संघाचे आमदार जगदीश
वळवी, मा.आ. दिलीप सोनवणे, रविंद्र भैया पाटील, जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक वाल्मिक
पाटील, राष्ट्रवादी कांग्रेसचे जिल्हा समन्वयक विलास पाटील, अंमळनेरचे
प्रांताधिकारी तुकाराम हिलवडे, तहसिलदार एस.बी.गवळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
कैलास मुळे, तालुका कृषि अधिकारी एस. पवारआदिसह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित
होते.
0 0 0 0 0
No comments:
Post a Comment