Monday, 10 September 2012

तिसऱ्या महिला धोरणाचा मसुदा महिन्याभरात अंतिम करावा - प्रा. वर्षा गायकवाड


मुंबई, दि. 10 : तिसऱ्या महिला धोरणाचा मसुदा अंतिम करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विषय समित्यांनी आपला अहवाल महिन्याभरात महिला धोरणासाठी नियुक्त केलेल्या समितीस सादर करावा, अशी सूचना महिला व बाल विकास मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज येथे केली.
तिसऱ्या महिला धोरणाचा मसुदा अंतिम करण्यासाठी शासनाने समिती गठीत केली आहे. या समितीची पहिली बैठक प्रा. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी तिसऱ्या महिला धोरणाच्या प्रत्येक मुद्यावर समितीतील सदस्यांची वेगवेगळी समिती स्थापन करुन त्या समित्यांना विषय वाटप करण्यात आले. या प्रत्येक समितीने महिन्याभरात अभ्यास व चर्चा करुन तिसऱ्या महिला धोरणाचा अंतिम मसुदा समितीपुढे ठेवावा, असे निर्देश प्रा. गायकवाड यांनी दिले.
महिला आर्थिक विकास महामंडळाकडून प्राप्त झालेल्या तिसऱ्या महिला धोरणाचा मसुदा तसेच निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्याकडून महिला धोरणाचा आराखडा प्राप्त झाला आहे. या आराखडयावर चर्चा करण्यासाठी समितीची ही पहिली बैठक होती.
महाराष्ट्रातील महिलांच्या सर्वंकष विकासासाठी व सक्षमीकरणासाठी प्रागतिक दृष्टीकोन रुजविणे व पुरुषप्रधान मानसिकता बदलण्यावर अधिक भर देणे. महिलांना त्यांच्या पसंतीचे आयुष्य जगता यावे यासाठी राजकीय, आर्थिक, सामाजिक, (आरोग्य, शिक्षण, पर्यावरण) व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये समानतेवर आधारीत विविध संधी निर्माण करणे,  धर्म, वर्ग, जाती, राजसत्ता, प्रदेश या कारणांमुळे वाढत्या हिंसेचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी स्त्रियांना पाठबळ देणे, किंबहुना या प्रकारच्या हिंसा होणारच नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविणे. मुलींची घटणारी संख्या थोपविणे. पारंपरिक प्रतिमांना छेद देण्यासाठी वास्तवातील पर्यायी प्रतिमा प्रभावीपणे उभ्या करण्यासाठी भागीदारी करणे. हे धोरण स्त्रियांना समतेचे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एक महत्वाचे साधन म्हणून कार्यान्वित करणे. महिलांचा नियोजन व निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, अशी उद्दिष्टे या महिला धोरणात ठेवण्यात आली आहेत.
यावेळी माजी राज्यमंत्री श्रीमती रजनीताई सातव, आमदार शोभाताई फडणवीस, महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, महिला व बालविकास आयुक्त राजेंद्र चव्हाण, महिला आयोगाचे सचिव ए. एन. त्रिपाठी, तसेच समितीचे मान्यवर सदस्य अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment