मुंबई, दि. 27 : अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या
जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या जातीच्या इयत्ता 11 वी व 12 वी
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या जाती प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी
अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबर पासून सुरु झाली आहे, असे जात पडताळणी
विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
सन 2012-13 या शैक्षणिक वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना
वैद्यकीय, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र व औषध निर्माण शास्त्र या अभ्यासक्रमासाठी
प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिकत असतांना
विहित नमुन्यातील अर्ज व त्यामध्ये निर्देश केलेली कागदपत्रे जाती प्रमाणपत्र
पडताळणीसाठी समिती कार्यालयात जमा करावयाची आहेत. त्यासाठी सेतु सुविधा केंद्रामध्ये
रु. 50 रुपये शुल्क भरुन विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहेत. विद्यार्थी www.evalidityonline.com या
संकेतस्थळावरुन विहित नमुन्यातील अर्जाची प्रत काढून ते हाताने भरु शकतात. या
समितीच्या कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध असून विद्यार्थी वरील
संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरुन व त्याची प्रिन्ट काढून त्यावर
महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा शिक्का व दिनांक घेऊन या समितीच्या कार्यालयात
सादर करु शकतात.
अर्जासोबत महाविद्यालयाच्या
प्राचार्यांचा शिक्का व दिनांक असलेला विहित नमुन्यातील अर्ज, अर्जदाराच्या
जातीच्या दाखल्याची सत्यप्रत, अर्जदाराचा प्राथमिक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/
शाळा नोंदवहीचा उतारा साक्षांकित प्रत (ज्यामध्ये जातीची नोंद आहे.), वडीलांचे
प्राथमिक शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / शाळा नोंदवहीचा उतारा साक्षांकित
प्रत.(ज्यामध्ये जातीची नोंद आहे), आजोबा/ मोठे काका/ मोठया आत्याचे शाळा
सोडल्याचे प्रमाणपत्र / शाळा नोंदवहीचा उतारा साक्षांकित प्रत, विहित नमून्यातील
शपथपत्र (समिती कार्यालयात उपलब्ध आहे.) अथवा सदरचा शपथपत्र नमुना www.evalidityonline.com या
संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घेता येईल. शपथपत्रावर कार्यकारी दंडाधिकारी
(Executive Magistrate)/ नोटरी यांची स्वाक्षरी तसेच शपथपत्र नोंदणी रजिस्टर मधील
अनुक्रमांक असणे आवश्यक आहे. वडील/ काका/ आत्या /आजोबा अशिक्षित असल्यास त्यांच्या
जन्म/ मृत्यू नोंदवहीचा उतारा (ज्यामध्ये जातीची नोंद आहे), महसुली दस्तऐवज, जुनी
खरेदी विक्रीची कागदपत्रे, अर्जदाराच्या जात प्रमाणपत्राच्या दाव्या पुष्ठ्यर्थ
अन्य कोणतेही जाती विषयक/ व्यवसाय विषयक पुरावे. (ज्यामध्ये जातीची नोंद आहे), अनुसूचित
जातीचा दावा असल्यास सन 1950 पूर्वीचा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे. विमुक्त
जाती/ भटक्या जमाती यांचेसाठी सन 1961 पूर्वीचा जातीचा पुरावा आवश्यक आहे., इतर
मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गसाठी 1967 पूर्वीचा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.
इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या व ज्यांचे जात प्रमाणपत्र ''
स्थलांतरित'' नमुन्यात आहेत त्यांनी समितीकडे अर्ज करु नये. अर्जदारांनी अर्जासोबत
जोडलेली कागदपत्रे ही महाविद्यालयाचे प्राचार्य अथवा राजपत्रित अधिकारी (गॅझेटेड
ऑफीसर) यांनीच साक्षांकित केलेली असावीत.
या समितीच्या सेतू सुविधा कार्यालयात
अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच अपूर्ण अर्जातील त्रुटीबाबत
विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येईल व त्रुटीची पुर्तता केल्यानंतर अर्ज
स्वीकारले जातील, असे अध्यक्ष, विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. 3,
मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment