Thursday, 6 September 2012

राज्य सेवा परीक्षांच्या पुर्वतयारीसाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना देणार प्रशिक्षण - नसीम खान


            मुंबई, दि. 6: पोलीस भरती तसेच आयएएस / आयपीएस पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी शसनामार्फत अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या योजनेला  यश मिळाले असून आता याच धर्तीवर एमपीएससी तसेच विविध राज्य शासकीय सेवेतील निवडीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या तयारीसाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. यासाठीची सर्व आवश्यक माहिती संकलित करुन तसा प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.
            श्री. खान यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज याबाबत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव सुब्रतो रथो, मुंबई एसआयएसीचे संचालक डॉ. मनोज भिडे, कोल्हापूर प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरचे संचालक डॉ. वसंत हेळवी, औरंगाबाद प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या संचालक डॉ. हेमलता वानखेडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित  होते.
            श्री. खान म्हणाले की, अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक तरुणांसाठी पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण दिले जाते. या योजनेला चांगले यश मिळाले असुन प्रशिक्षण घेतलेल्या हजाराहुन जास्त विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड झाली आहे. तसेच यशदा आणि राज्य शासनाच्या आएएस प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविली जात असलेली आयएएस / आयपीएस पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनाही यशस्वी होत आहे. या योजनेतून प्रशिक्षण घेतलेले काही अल्पसंख्याक विद्यार्थी युपीएससीची पुर्व परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले असून आता ते मुख्य परीक्षेची तयारी करीत आहेत. या योजनेला आता व्यापक स्वरुप देणे गरजेचे असून त्याचाच भाग म्हणून आता एमपीएसीसह विविध राज्य शासकीय सेवेतील भरतीसाठीही अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी असे प्रशिक्षण देऊ शकणाऱ्या शासकीय व खासगी संस्थांची माहिती, राज्य शासकीय सेवांमध्ये असलेले अल्पसंख्याक अधिकाऱ्यांचे प्रमाण आदी माहिती संकलीत करावी. या प्रशिक्षणासाठीचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश श्री. खान यांनी यावेळी दिले.

No comments:

Post a Comment