Sunday, 23 September 2012

शेतक-यांनी शेतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा


चाळीसगांव दि.23 :  चाळीसगांव कृषि उत्पन्न बाजार समिती, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (भारत सरकार) व महाराष्ट्र शासन कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लिंबू, मोसंबी, डाळींब व केळी फळ पिकावरील परिसंवाद व शेतकरी मेळाव्याचे उदघाटन आणि बाजार समितीच्या आवारातील विकास कामांतर्गत भुसार सेल हॉल समोरील काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आज पणन, सहकार व वस्त्रोद्योग राज्यमंत्री ना. प्रकाशराव सोळंके यांच्या शुभहस्ते व कृषि, जलसंधारण, परिवहन राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
            या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चाळीसगांव कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती  श्री. उदेसिंग पवार होते. यावेळी आमदार राजीव देशमुख, माजी आमदार दिलीप सोनवणे, विभागीय सह निबंधक सह. संस्था नाशिकचे श्री. गौतम भालेराव, जिल्हा उपनिबंधक सह. संस्था, जळगांवचे  श्री. सुनिल बनसोडे, जिल्हा मध्यवर्ती सह. बँकचे संचालक श्री. प्रदीप देशमुख, कृ.ऊ.बाजार समितीचे सभापती ॲड. रोहिदास पाटील, उपसभापती जालम पाटील, तहसिलदार श्री. शशिकांत हदगल, जळगांव जिल्हा कृषि विकास अधिकारी श्री. एन. व्ही. देशमुख, कृषि अधिकारी सुनिल भोकरे,डॉ. डी. एन. कापसे, डॉ.  एच. व्ही. इंगळे, श्री. चंद्रशेखर पुजारी, नाशिक डाळींबबाग संघाचे अध्यक्ष श्री. रामदास पाटील, श्री. शिवाजी आमले, जळगांव जिल्हा मध्यवर्ती सह. बँकचे संचालक वाल्मिक पाटील, पंचायत समिती सभापती श्री. विजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष गफ्फार मल्लिक, राष्ट्रवादी जिल्हा समन्वय श्री. विलास पाटील  आदी मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
            पालकमंत्री ना. देवकर म्हणाले की, चाळीसगांव कृषि उत्पन्न बाजार समितीने शेतक-यांची उन्नती केली असून माल व्यापा-यांच्या माध्यमातून मालाचा ताबडतोब लिलाव केला जातो व शेतक-यांना चोवीस तासाच्या आत पेमेंट केले जाते ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. त्याचबरोबर शेतक-यांचे हिताचे रक्षण व न्याय देण्याचे काम समिती खंबीरपणे पार पाडत आहे. समितीने शेतक-याला, सभासदाला सर्वतोपरी सहकार्य करुन त्यांना मदत करावी. तसेच पिकांवरील रोगामुळे ज्या शेतक-यांचे नुकसान होते त्या शेतक-यांना योग्य लाभ देऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी दिलासा देण्याचे काम या माध्यमातून होते
यावेळी  ना. सोळंके म्हणाले की, शेतक-यांना योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे. त्यांच्यापर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचले पाहिजे. त्या माध्यमातून शेतक-यांचा विकास करता येईल. तसेच फळबाग साठवणूक व्यवस्था नाही. त्यामुळे उत्पादन नासून जाते म्हणून या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्यामुळे केळी, लिंबू उत्पादक शेतक-यांना निश्चितच लाभ होईल. तसेच आ. देशमुख यांनी तालुक्यात झालेल्या विकास कामांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे बेलगंगा साखर कारखाना चालू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणा-या शेतक-यांना व्याज सवलतीचा लाभ मिळण्यासाठी पीक कर्जाच्या कमाला मर्यादेत वाढ केली आहे. त्यामुळे आता नियमित कर्जाची परतफेड करणा-या शेतक-यांना एक लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज शुन्य टक्के व्याज दराने व त्यापुढील 3 लाख रुपयांपर्यंचे पीक कर्ज केवळ 2 टक्के व्याज दराने उपलब्ध झाले आहे. त्यामुळे शेतक-यांनी शुन्य टक्के व्याजाचा फायदा घेतला पाहिजे व त्यातून आपला विकास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            प्रारंभी मोसंबी, डाळींब, लिंबू, केळी या फळपिकांचा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार शेतक-यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. त्याचबरोबर ठिबक सिंचन अनुदानाचे चेकद्वारे वाटप लाभार्थ्यांना मान्यवराच्या हस्ते करण्यांत आले
            शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करतांना आ. देशमुख म्हणाले की, पावसामुळे पिकांचे नुकसान होते आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. अशा परिस्थितीतही शेतक-यांनी कमी पाण्यात विक्रमी उत्पादन घेण्याचे काम केले आहे.फळबाग उत्पादन योजनेंतर्गत लिंबू, डाळींब, मोसंबी क्षेत्र वाढविले पाहिजे. विकासाचे ध्येय व शेतक-यांना केंद्रबिंदू मानून विकास करावयाचा आहे. एमआयडीसीला चालना मिळावी व त्यामाध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी शेतीविषयक तज्ञांनी फळपिकांबाबत उपस्थित शेतक-यांना बहुमुल्य असे मार्गदर्शन केले.
            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहिदास पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रदीप देशमुख यांनी केले. यावेळी  शेतकरी  मोठया संख्येने उपस्थित होते.
                                                            * * * * * * *

No comments:

Post a Comment