Friday, 21 September 2012

संपूर्ण जिल्हयासाठी केळी पिकाला विमा संरक्षण : कृषि राज्यमंत्री ना. देवकर

जळगांव, दि. 21 :- सन 2011-12 मध्ये जिल्हयातील रावेर, चोपडा, यावल आदि तालुक्यातील  शेतक-यांच्या केळी पीकाला विमा संरक्षण देण्यात आलेले होते. परंतु शासनाने सन 2012-13 या वर्षापासून संपूर्ण जिल्हयासाठी केळी पिकाला संरक्षण जाहिर केलेले असल्याने सर्व शेतक-यांनी केळी पिकाचा विमा उतरवून केळी पीक विमा संरक्षण योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी राज्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले ते जळगांव तालुका कृषि विभागाने रिधुर येथे आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक वाल्मीक पाटील, प्रगतीशील शेतकरी गोपाळ पाटील, जळगांव आत्मा समिती अध्यक्ष प्रवीण दंगल पाटील, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष गोकुळ चव्हाण, आत्मा समिती सदस्य शांताराम सोनवणे व शांताराम पाटील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किसन मुळे, ममुराबाद कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक डॉ. एस.एस. पाटील, तालुका कृषि अधिकारी व्ही.ई. पाटील आदिसह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
जळगांव जिल्हयात केळीचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतले जात असल्याने केळीला फळ पीकाचा दर्जा मिळवून देऊन फळ विमा संरक्षण योजनेत केळी पीकाचा समावेशाकरिता पाठपुरावा केल्याचे ना. देवकर यांनी सांगितले. सन 2011-12 मध्ये राज्यात केळी पिकावर करपा रोग पडून शेतक-यांना मोठे नुकसान झाले. परंतु विमा संरक्षणात भाग घेतलेल्या शेतक-यांना विमा कंपनीकडून राज्यातील शेतक-यांना 34 कोटी रु. चे वाटप करण्यात आले त्यातील 17 कोटी रु. जळगांव जिल्हयाला मिळाल्याची माहिती ना. देवकर यांनी दिली सदरची योजना यावर्षी पासून संपूर्ण जिल्हयासाठी लागू करण्यात आली असल्याने जास्तीत जास्त शेतक-यांनी केळी पिकाचा विमा उतरविण्याचे आवाहन ना. देवकर यांनी केले. दर हेक्टरी 12 हजाराचा विमा हप्ता असून त्यात केंद्र व राज्य शासन प्रत्येकी तीन हजार रु. विमा कंपनीस देईल असे ही त्यांनी सांगितले.
गतिमान कडधान्य कार्यक्रमातर्गत जिल्हयात मागील दोन-तीन वर्षापासून हरभरा, मूग, उडीद पिकांच्या उत्पादन वाढीसाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात असून पूर्वीपेक्षा कडधान्य उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे ना. देवकर यांनी सांगितले या अंतर्गत शासनाकडून शेतक-यांना कडधान्य उत्पादनासाठी निविष्ठा बि- बियाणे पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले कृषि विभागाच्या सहकार्याने शेतक-यांना तांत्रिक व प्रगत तंत्रज्ञानाची माहिती व निविष्ठा देऊन कडधान्य उत्पादनात मोठी वाढ करण्यात आल्याची माहिती ना. देवकर यांनी दिली.
            गतिमान कडधान्य कार्यक्रम व राष्ट्रीय अन्न व सुरक्षा अभियानांतर्गत रिधुर येथे शेतकरी प्रशिक्षणाचा आयोजनामागील उद्देश हा शेतक-यांना कडधान्य उत्पादनाकरिता प्रोत्साहन देणे व केळी वरील करपा रोगांबद्दल मार्गदर्शन करणे असल्याची माहिती उपविभागीय कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
            सदरच्या प्रशिक्षणात कापूस पिक सध्यास्थिती (डॉ. एस.एस.पाटील) , गहू, हरभरा व भाजीपाला लागवड, व पाण्याचे नियोजन (डॉ. हिरवे) केळी पिकावरील रोग व व्यवस्थापन (प्रा. सुरेखा परदेशी) ठिंबक संच देखभाल ( श्री. पाठक), रब्बी हंगामावरील तण व तणांचे नियंत्रण ( श्री. दीपक फडतरे) व शेवटी शेतक-यांचे शंका निरसन आदि मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाले.
            सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनू पाटील यांनी केले तर आभार तालुका कृषि अधिकारी व्ही.ई. पाटील यांनी मानले.
*  * * * * * * *

No comments:

Post a Comment