Monday, 17 September 2012

नॅशनल मोन्युमेंट अथॉरिटी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांच्यात पर्यटकांच्या सुविधेसाठी सामंजस्य करार करावा-मुख्य सचिव



       मुंबई, दि. 17 : राज्यातील पर्यटनस्थळांच्या परिसरात पर्यटकांना विविध सुविधा पुरविणे सुकर व्हावे यासाठी नॅशनल मोन्युमेंट अथॉरीटी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार करण्यात यावा, असे निर्देश मुख्य सचिव जयन्त कुमार बाँठिया यांनी आज येथे दिले.
       मंत्रालयात केंद्रीय सांस्कृतिक सचिव संगिता गैरोला यांनी आज मुख्य सचिवांची भेट घेतली. यावेळी मुख्य सचिवांच्या दालनात झालेल्या राज्यातील पर्यटन विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.
        या पर्यटनस्थळांच्या परिसरात स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे आवश्यक आहे. त्यामुळे हजारो पर्यटकांना त्याचा फायदा होणार आहे. यासाठी ज्या ठिकाणी अशा सुविधांची आवश्यकता आहे त्याबाबत सर्वेक्षण करावे. नॅशनल मोन्युमेंट अथॉरीटी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार झाल्यास ही कामे सुलभ होतील, असेही मुख्य सचिवांनी सांगितले.
        नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाला 150 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाबाबत मुख्य सचिवांनी केंद्रीय सांस्कृतिक सचिवांशी चर्चा केली. याप्रदर्शनाच्या माध्यमातून न्यायसंस्थेविषयक वस्तुसंग्रहालय उभारता येऊ शकते. त्यासाठी केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाने पुढाकार घेण्याचे आवाहनही मुख्य सचिवांनी केले.
        बैठकीस महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जगदीश पाटील, फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख, सांस्कृतिक कार्य संचालक आशुतोष घोरपडे आदींसह पर्यटन, सांस्कृतिक कार्य आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment